Join us

Kanda Bajar Bhav : तीन दिवसांच्या सुटीनंतर सोलापुरात कांद्याची आवक वाढली.. कसा मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 11:50 AM

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत तीन दिवसांच्या सुटीनंतर बुधवारी कांद्याची आवक वाढली. त्यामुळे शनिवारी साडेपाच हजारांवर गेलेला दर पुन्हा पाच हजारांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत तीन दिवसांच्या सुटीनंतर बुधवारी कांद्याची आवक वाढली. त्यामुळे शनिवारी साडेपाच हजारांवर गेलेला दर पुन्हा पाच हजारांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

केंद्र सरकाराने निर्यात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतल्याने दोन दिवसांत कांद्याचा दर वाढला होता. शनिवारी सोलापुरात कांद्याचा दर साडेपाच हजारांपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे आता कांद्याचा दर वाढत राहील, अशी आशा शेतकऱ्यांना होती.

त्यामुळे तीन दिवसांच्या सुटीनंतर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात माल आलेला होता. कर्नाटकातील इंडी, विजयपूर या भागातील रात्रीच गाड्या आल्या होत्या. शिवाय कलबुर्गी, आळंद, अफलपूर तालुक्यातून पांढऱ्या कांद्याची वाढली आहे.

बुधवारी जवळपास १३४ ट्रक कांद्यामध्ये २० ट्रक पांढऱ्या कांद्याची आवक होती. आवक वाढत असल्यामुळे दरातही घसरण होत आहे. पुणे, अहमदनगर जिल्ह्यासह आता सातारा जिल्ह्यातील म्हसवड तालुक्यातून कांद्याची आवक वाढली आहे.

मागील वर्षांपासून साताऱ्याच्या कांद्याची आवक सुरू झाली आहे. विशेष म्हणजे यंदा दिवाळीपूर्वीच नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. दरवर्षी दिवाळी झाल्यानंतर नवीन कांदा मार्केटमध्ये येतो. यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे कांद्याची आवक लवकर सुरू झाल्याचे सांगण्यात आले.

कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे शनिवारपेक्षा दरात घसरण झाली आहे. मात्र, येणाऱ्या काळात दर स्थिर राहण्याची अधिक शक्यता आहे. त्यात आता नवीन कांदा विक्रीसाठी येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील कांदा अद्याप मार्केटमध्ये आलेला नाही. दिवाळीच्या दरम्यान आवक सुरू होईल. - नामदेव शेजाळ, कांदा विभाग प्रमुख

टॅग्स :कांदासोलापूरबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरीशेतीकर्नाटककेंद्र सरकार