घोडेगाव : नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात सोमवारी (दि.२८) झालेल्या लिलावात गावरान कांद्याचे भाव स्थिर राहिले. नवीन लाल कांद्याच्या भावात घसरण झाली.
यात गावरान एक दोन वक्कलसाठी पाच हजार दोनशे रुपयाचा भाव मिळाला, तर सरासरी चार हजार सहाशे ते पाच हजार रुपये भाव मिळाला. नवीन लाल कांद्याच्या एक अर्ध्या वक्कलसाठी चार हजार, तर सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार चारशे रुपये भाव मिळाला.
घोडेगाव उपबाजारात मागील आठवड्याच्या तुलनेने गावरान कांद्याची आवक घटली. लाल कांद्याची आवक वाढत आहे. बुधवारी बाजार समितीत एकूण २४ हजार ४ कांदा गोण्यांची आवक झाली होती. यापैकी ४ हजार ९१७ लाल कांदा गोण्यांची आवक आली होती.
यावेळी झालेल्या लिलावात गावरान कांद्याच्या एक-दोन लॉट प्रतिक्विंटल पाच हजार दोनशे रुपये, तर मोठा कांदा ४५०० ते ४८००, मुक्कल भारी ४१०० ते ४५०० गोल्टी ३७०० ते ३९००, जोड कांदा १५०० ते ३००० रुपये असा भाव मिळाला.
तर नवीन लाल कांद्याला आठशे ते तीन हजार सातशे भाव मिळाल्याचे कांदा आडतदार दीपक मिसाळ यांनी सांगितले.
नवीन लाल कांदा पावसामुळे भिजला आहे. त्यामुळे कांदा बाजारात खराब येत आहे. तसेच दिवाळी सणामुळे वरती कांदा खरेदीदारांनी खरेदी बंद केली. त्यामुळे कांद्याला मागणी कमी झाली आहे. लाल कांदा जास्त दिवस टिकत नसल्याने लाल कांद्याच्या भावात घसरण झाली आहे. - मुकुंद शिरसाट, कांदा आडतदार, घोडेगाव
दिवाळीचा सण असल्यामुळे व सर्वांना दिवाळी सणाचा आनंद घेता यावा यासाठी बुधवार, शनिवार, सोमवार या दिवशी होणारे लिलाव बंद राहणार आहेत. व बुधवार (दि.६) नोव्हेंबरला कांदा लिलाव पुन्हा सुरू होणार आहे. - संभाजी भवार, शाखाधिकारी घोडेगाव उपबाजार