Join us

Kanda Bajar Bhav : कर्नाटकातील नवीन पांढरा कांदा सोलापूर मार्केटमध्ये लाल कांद्याला कसा मिळतोय बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 12:12 PM

सोलापूर बाजार समितीत कांद्याला सध्या चांगला दर मिळत आहे. कर्नाटकातील नवीन पांढऱ्या कांद्याची आवक सुरू झाली आहे. शिवाय पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील जुना लाल कांदा आता विक्रीला येत आहे.

सोलापूर : सोलापूरबाजार समितीत कांद्याला सध्या चांगला दर मिळत आहे. कर्नाटकातील नवीन पांढऱ्या कांद्याची आवक सुरू झाली आहे. शिवाय पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील जुना लाल कांदा आता विक्रीला येत आहे.

त्यामुळे आजही १०० ते १५० ट्रक कांद्याची आवक आहे. लाल कांद्याला ४६०० रुपये तर पांढऱ्या कांद्याला ५२०० रुपयांचा दर मिळत आहे. सोलापूर बाजार समितीत वर्षभर कांद्याची आवक असते. सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड होत आहे.

यंदाही समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे.  मात्र, सध्या सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजार आलेला नाही. मात्र, पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील जुना लाल कांदा आता विक्रीसाठी येत आहे. 

पुणे, अहमदनगर भागातील कांदा वर्षभर टिकतो. कांदा चाळीत शेतकरी साठवण करून पावसाळ्यात विक्रीला काढतात. सध्या लाल कांद्याची आवक १०० ते १५० ट्रक आहे. त्यात पांढरा कांदा कमीच आहे. मात्र, पांढऱ्या कांद्याला दर चांगला मिळत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पांढऱ्या कांद्याचा दर पाच हजारांपेक्षा जास्त झालेला आहे. सरासरी दरही ३५०० रुपयांपर्यंत आहे. सध्या कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील पांढरा कांदा सोलापुरात येत आहे.

गुरुवारी पाच ट्रक पांढऱ्या कांद्याची आवक होती. आता नवीन माल हळूहळू विक्रीला येत आहे. लाल कांद्यालाही ४६०० रुपयांपर्यंत दर आहे. सरासरी दर ३४०० रुपये मिळत आहे.

दिवाळीनंतर सोलापूर जिल्ह्यातून मोठी आवकदिवाळी झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून सोलापूर जिल्ह्यातील कांद्याची आवक सुरू होते. डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांत सोलापूर बाजार समितीत सरासरी ७०० ते १००० ट्रक कांद्याची आवक असते, नवीन माल बाजार येईपर्यंत दर स्थिरच राहणार आहेत. यंदा आवक वाढण्याची शक्यता आहे.

सध्या कांद्याला चांगला दर मिळत आहे. आता नवीन पांढरा कांदा मार्केटमध्ये येत आहे. गुरुवारी कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातून पाच ट्रक पांढरा कांदा विक्रीला आलेला होता. महिनाभर आता दर स्थिरच राहण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर पुन्हा नवीन कांदा येणार आहे. - नामदेव शेजाळ, कांदा विभाग प्रमुख, सोलापूर बाजार समिती

टॅग्स :कांदाबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्डसोलापूरशेतकरीकर्नाटक