कोल्हापूर : ऑक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसाने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सध्या कांदा चांगलाच तापला आहे. घाऊक बाजारात जुना कांदा ६२ रुपये, तर नवीन कांदा ४५ रुपयांपर्यंत पोहचला आहे.
नवीन कांद्याची आवक कमी आणि मागणी कायम असल्याने बाजार तेजीत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. कांद्याची आवक वाढण्यास अजून पंधरा वीस दिवस लागणार असल्याने तोपर्यंत तेजी कायम राहणार आहे.
एप्रिल मे महिन्यात कांद्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. खरिपामध्ये सोलापूर, पुणे, नाशिक, सातारा जिल्ह्यात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली.
पण, यंदा पाऊस सगळीकडेच जोरदार कोसळला. त्यात कांदा काढणीस आल्यानंतर परतीच्या पावसाने झोडपल्याने नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले.
साधारणतः ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून नवीन कांदा बाजारात येतो. पण, पावसामुळे नुकसान झाल्याने नोव्हेंबर संपत आला तरी अपेक्षित आवक बाजारात दिसत नाही. त्याचा परिणाम दरावर झाला आहे.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी जुन्या कांद्याचे उसळी घेतली होती. चांगल्या प्रतीचा जुना कांदा प्रतिकिलो ५५ ते ६२ रुपये, तर नवीन कांदा ४५ ते ५० रुपयांपर्यंत पोहचला होता.
त्यामुळे हा कांदा किरकोळ बाजारात ७० रुपयांपर्यंत गेला. साधारणतः हॉटेलसह मोठ्या जेवणासाठी जुन्याच कांदा लागतो. त्यामुळे मागणी अधिक आणि आवक कमी झाल्याने तेजी आहे.
चाळीतील कांदा संपला
एप्रिल, मे महिन्यात कांद्याचे भाव कोसळल्यानंतर शेतकऱ्यांनी काही कांदा चाळीत ठेवला होता. पावसाळ्यात थोडी तेजी मिळेल, असे अपेक्षित होते. मात्र, सप्टेंबर महिन्यात चांगल्या प्रतीचा कांदा ४०, तर त्यापेक्षा कमी प्रतीचा १५ रुपयांपर्यंत दर राहिले. ऑक्टोबरनंतर शेतकऱ्यांनी चाळीतील कांदा बाजारात आणला, त्याला दर चांगला मिळू लागल्याने हा कांदाही संपला आहे.
येथून येतो कोल्हापुरात कांदा
सोलापूर, सांगोला, मंगळवेढा, बार्शी, नाशिक, सातारा, अहमदनगर, पुणे.
बाजार समितीतील मंगळवारचे दर प्रतिकिलो
कांदा - प्रत - दर रुपये
जुना - चांगली - ५५ ते ६२
जुना - हलका - ३० ते ४०
नवीन - चांगली - ४५ ते ५०
नवीन - हलका - १५ ते ३०
परतीच्या पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाल्याने आवक मंदावली आहे. आणखी पंधरा दिवस असेच दर राहण्याची शक्यता आहे. - कुभार आहुजा, व्यापारी प्रतिनिधी, बाजार समिती
अधिक वाचा: Jaminiche Bakshish Patra : जमिनीचे बक्षीसपत्र म्हणजे काय? आणि ते का करायचे वाचा सविस्तर