श्रीरामपूर : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये यंदा कांद्याला मागील वर्षापेक्षा चांगले दर मिळत आहेत. कांद्याचे दर क्विंटलमागे १६०० ते १८०० रुपयांवर आहेत.
केंद्र सरकारने २० टक्के निर्यात शुल्क हटविल्यास दर वाढतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यापर्यंत मागील मोसमात पाऊस सुरू होता. त्यामुळे कांद्याची रोपे उशिराने पेरली गेली. त्याच्या परिणामी कांदा लागवड उशिरा करण्यात आली.
बाजार समित्यांमध्ये एरवी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये कांद्याची आवक सुरू होत असत. यंदा मात्र १५ मार्चनंतर आवक वाढली आहे. मात्र, असे असले तरी कांद्याला दर चांगले मिळत आहेत.
त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना काढणी केलेला कांदा बाजार समितीत विक्रीसाठी आणला. ओल्या मालाला चांगले वजन मिळते. त्यामुळे या दरामध्ये कांद्याची विक्री परवडणारी ठरते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
सरासरीत घट
यंदा कांद्याचे क्षेत्र वाढले असले तरी त्याची सरासरी उत्पादकता घटली आहे. उशिराने लागवड केलेल्या कांद्यावर करपाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे यंदा कांद्याचे क्षेत्र वाढूनही उत्पादन घटेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
२० टक्के निर्यात शुल्क
सध्या बाजारात विक्रीसाठी आलेला कांदा हा ओला आहे. त्याच्यामध्ये टिकवण क्षमता नाही. अवघ्या चार-पाच दिवसांमध्ये दक्षिण भारतात तो खाना झाल्यानंतर ओलसर पडतो. साठवणूक व निर्यात करण्यायोग्य कांद्याची काढणी एप्रिल व मे महिन्यामध्ये होईल. त्यामुळे सध्या केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क लावण्यात काहीही अर्थ नाही. निर्यात योग्य कांदा जर बाजारात आलेला नाही, तर शुल्क का लावण्यात आले, असा सवाल श्रीरामपूर बाजार समितीचे सचिव साहेबराव वाबळे यांनी उपस्थित केला आहे. शुल्क हटविल्यास कांद्याचे दर २ हजार रुपये क्विंटलपर्यंत जातील, असे त्यांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांनी टप्प्याटप्याने कांदा विक्रीसाठी आणावा. बाजार समितीच्या बाहेर मालाची विक्री करू नये. त्यातून फसवणुकीची भीती आहे. - साहेबराव वाबळे, सचिव, श्रीरामपूर बाजार समिती
अधिक वाचा: साठवणुकीत कांद्याला मोड येऊ नये म्हणून करा हा सोपा उपाय? वाचा सविस्तर