ओतूर: यंदा राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, कांदा आवक ५० टक्के घटली. त्यामुळे जुन्या कांद्याने उच्चांकी दर गाठला आहे.
ओतूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध जिल्ह्यातून नवीन कांदा येत असतो; परंतु यंदा परतीच्या पावसासह अवकाळी पावसाने घातलेल्या धुमाकुळाने कांदा पिकाचे नुकसान झाले आहे.
यापूर्वी बाजार समितीमध्ये रोज मोठी आवक होत होती; परंतु सध्या कमी कांदा आवक होत आहे. गुरुवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी कृषी उत्पन्न ओतूर उपबाजारात ७३३९ पिशवी कांद्याची आवक झाली होती.
१० किलोंचा दर पुढीलप्रमाणेगोला कांदा ६७० ते ७२१सुपर कांदा ६०० ते ७००नंबर २ गोल्टी/गोल्टा कांदा ३०० ते ६००कांदा बदला २०० ते ४५० असा बाजारभाव मिळाला.
गेल्या महिन्यात जुन्नर तालुक्यात कांद्याचे भाव दहा किलोंचे भाव ४०० ते ५०० रुपये होते. आता ७० रुपये प्रतिकिलो मोजावे लागत आहेत, किरकोळ बाजारात कांद्याचे दर अधिक वाढले गेले आहेत. परतीच्या पावसाचा परिणाम ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमधील कांद्याच्या पिकाला बसला आहे.
सध्याचे कांद्याचे बाजारभाव हे शेतकऱ्यांसाठी वरदान आहे, बाजारभाव कमी होते त्यावेळी वाटत होते की, भाव मिळतील की नाही? पण बाजारभाव वाढले असल्याने शेतकरी या बाजारभावांमुळे खरोखर समाधानी आहेत. मेहनत केली पण त्याचे फळ मिळाले असे मला वाटते. अवकाळी पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले; पण कांद्याचे भाव वाढल्याने काही शेतकऱ्यांना वर आणाले. - राहुल गायकर, कांदा उत्पादक शेतकरी