घोडेगाव : नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपबाजारात बुधवारी झालेल्या लिलावात कांद्याला सरासरी ३ हजार ७०० ते ४ हजार रुपये भाव मिळाला.
आवारात मागील आठवड्याच्या तुलनेने आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने कांद्याचे दर वाढले आहेत. बुधवारी बाजार समितीत एकूण ३६ हजार ५८२ कांदा गोण्यांची आवक झाली होती.
यावर्षी कांदा उत्पादनात घट झाली आहे. तसेच गेल्या काही दिवसांत कांदा खराब होऊ लागल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना जागेवरच कांदा विकला आहे. त्यामुळे बाजार समितीत कांद्याची आवक घटल्याने दर वाढले आहेत.
बुधवारी लिलावात दोन लॉट प्रतिक्विंटल ४ हजार २०० त्यानंतर मोठा कांदा ३८०० ते ४०००, मुक्कल भारी ३७०० ते ३९०० गोल्टी ३८०० ते ४०००, जोड कांदा १५०० ते ३००० रुपये, असा भाव मिळाल्याचे आडत व्यापारी किरण वैरागर यांनी सांगितले.