Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Bajarbhav : सोलापूर बाजार समितीत १९२ ट्रक कांदा आवक जुना कांदा खातोय भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 11:06 IST

गेल्या दोन दिवसात कांद्याच्या दरात अचानक वाढ झाली. सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा कांदा अद्याप शेतातच आहे. कांदा काढायला वेळ आहे. मात्र, पुण्याच्या जुन्या कांद्याला Onion Market Solapur सोलापुरात चांगला भाव मिळत आहे.

विठ्ठल खेळगीसोलापूर : गेल्या दोन दिवसात कांद्याच्या दरात अचानक वाढ झाली. सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा कांदा अद्याप शेतातच आहे. कांदा काढायला वेळ आहे. मात्र, पुण्याच्या जुन्या कांद्याला सोलापुरात चांगला भाव मिळत आहे.

सोलापूर बाजार समितीत ५ हजार रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळे सोलापूरच्या बाजारात पुण्याच्या कांद्याचाच बोलबाला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वर्षभर असते.

मागील वर्षभरात तब्बल ८० लाख क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यामुळे सोलापुरात कांदा महाबँक उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सोलापूर बाजार समितीत सोलापूर जिल्ह्यासह, पुणे, अहमदनगर, विजयपूर, गुलबर्गा आदी जिल्ह्यांतून कांदा येतो.

यंदा जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांनी थेट कांद्याची पेरणीच केली आहे. त्यामुळे येणाऱ्या हंगामात कांद्याची आवक मोठी असण्याची शक्यता आहे.

सध्या सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक कमी आहे. मुळात सोलापूर जिल्ह्यात कांदा मे किंवा जास्तीत जास्त जूनपर्यंत विकला जातो. त्यानंतर आपल्याकडील कांदा टिकत नाही. सध्या पुणे, अहमदनगर जिल्ह्यांतून कांद्याची आवक सुरू आहे.

सरासरी १०० ते १५० ट्रक कांदा आता पावसाळ्यात सुरू आहे. मागील दोन दिवसात अचानक दरात वाढ झाली आहे. निर्यातबंदी उठवल्यानंतर कांद्याला सरासरी ३ हजारांपर्यंत दर मिळत होता.

मात्र मागील दोन दिवसात सोलापुरातील दर पाच हजारांपर्यंत पोहोचला आहे. सरासरी दरही ४ हजारांपर्यंत आहे. मात्र, या वाढलेला दराचा फायदा पुण्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.

नवीन कांदा येईपर्यंत दर स्थिर राहणारसोलापूर जिल्ह्यात कांदा दिवाळीनंतर म्हणजे डिसेंबरमध्ये विक्रीसाठी येणार आहे. यंदा मोठ्या प्रमाणात कांदा येण्याची शक्यता आहे. सोलापूर बाजार समितीत जानेवारी व फेब्रुवारीमध्ये एक हजार ट्रक कांद्याची आवक असते. त्यामुळे नवीन कांदा विक्रीला येईपर्यंत दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.

शासनाचा कांदा बाहेर आल्यास दर कमी होणारशासनाने खरेदी केलेला कांदा अद्यापही फेडरेशनकडे पडून आहे. तो विकलेला नाही. शेतकऱ्यांकडून १५०० ते २००० रुपये क्विंटल दराने खरेदी केलेला कांदा आता शासन विक्रीसाठी काढण्याची शक्यता आहे. कारण ३००० रुपयांना कांदा विकला तरी शासनाला मोठा फायदा होणार आहे. हा कांदा येत्या काही दिवसांत पुणे, मुंबई, विजयवाडा आदी शहरांत पोहोचण्याची शक्यता आहे.

सध्या कांद्याचा दर चांगला मिळत आहे. मात्र, शासनाचा कांदा विक्रीला आल्यास दरात थोडीफार घट होईल. मात्र, सरासरी ३ हजारांचा दर राहण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे सध्या कांदा नाही. पुणे जिल्ह्यातून मालाची आवक सुरू आहे. - केदार उंबरजे, कांदा व्यापारी

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसोलापूरशेतकरीशेतीसरकारराज्य सरकारपुणे