नवी मुंबई : निवडणुकीमध्ये निर्यातबंदीवरून झालेल्या गदारोळानंतर Onion Bajarbhav कांद्याच्या दरामध्ये वाढ होऊ लागली आहे. मुंबईबाजार समितीमध्ये मे अखेरीस ५ ते ११ रुपये किलो दराने कांदा विकला जात होता.
आता हेच दर १७ ते २५ रुपये किलोवर पोहचले आहेत. दर चांगले मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी मुंबईत मोठ्या प्रमाणात कांदा पाठविण्यास सुरुवात केली आहे. कांदा किती दिवस घरात
ठेवायचा अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती.
ऐन निवडणुकीमध्येही कांदा विषयावर गदारोळ झाला होता. प्रचारामध्येही या विषयावरून विरोधकांनी रान उठविण्यास सुरुवात केली होती. योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली होती.
सोमवारी १ हजार २४४ टन कांदा विक्रीसाठी
■ मे महिन्यात प्रतिकिलो ५ ते ११ रुपये बाजारभाव मिळू लागला होता. परंतु मागील काही दिवसांमध्ये कांद्याला चांगला भाव मिळू लागला आहे. सोमवारी बाजार समितीमध्ये प्रतिकिलो १७ ते २५ रुपये भाव मिळत आहे. गतवर्षी जूनमध्ये ५ ते १३ रुपये भाव मिळाला होता.
■ त्या तुलनेमध्ये यावर्षी चांगला भाव मिळत आहे. मुंबईत दर चांगला मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनीही मोठ्याप्रमाणात माल विक्रीसाठी पाठविण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी १२४४ टन कांदा विक्रीसाठी आला होता.
बाजार समितीमधील कांद्याचे दर
महिना - बाजारभाव
जानेवारी - १६ ते २७
फेब्रुवारी - १० ते १७
मार्च - १२ ते १९
एप्रिल - १२ ते १७
मे - ५ ते ११
जून - १७ ते २५
या आठवड्यात कांदा दरात सुधारणा
बाजार समितीमधील व्यापारी किशारे ठिगळे यांनी सांगितले की या आठवड्यात कांदा दरामध्ये चांगली सुधारणा आहे. आवकही समाधानकारक होत असल्याची माहिती त्यांनी दिली.