मंचर : आवक वाढल्याने तसेच कमी प्रतीचा कांदा विक्रीसाठी आल्याने मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव ढासळले आहेत. मंगळवारी दहा किलो कांदा २९० रुपये या भावाने विकला गेला आहे, अशी माहिती उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला मंगळवारी १० किलोला २९० रुपये, असा बाजारभाव मिळाला. १७ हजार ८४ पिशवी कांद्याची आवक झाली आहे.
तसेच राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांत नवीन कांद्याचे उत्पादन चांगले झाल्यामुळे आणि तो कांदा बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्याने कांद्याचे बाजारभाव कमी झाले असून, बाजारभाव २५ ते ३० टक्के कमी झाल्याची माहिती व्यापारी बाळासाहेब रंगनाथ बाणखेले यांनी दिली.
मंचर बाजार समितीत कांद्याची आवक वाढू लागली असून, चांगल्या बाजारभावाच्या आशेने शेतकरी शेतात काढलेला कांदा लगेच विक्रीसाठी आणत आहे. अनेक वेळा काढणी लवकर केल्याने कांद्याची प्रतवारी नीट राहत नाही, त्यामुळेही बाजारभाव कमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.
कांद्याचे प्रतिदहा किलोचे दर
सुपर लॉट १ नंबर गोळा कांदा २८० ते २९० रुपये.
सुपर गोळे कांदे १ नंबर २५० ते २७० रुपये.
सुपर मीडियम २ नंबर २२० ते २५० रुपये.
गोल्टी कांद्यास ८० ते १५० रुपये.
बदला कांद्यास ४० ते १०० रुपये.
कांद्याचे बाजारभाव कमी होऊ लागल्याने शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. दिवसेंदिवस भांडवली खर्च वाढत असून, बाजारभाव कमी होऊ लागल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडू लागला आहे.