सातारा : जिल्ह्यातील बाजारात उन्हाळी कांद्याची आवक वाढल्यामुळे दरात उतार आला आहे. सातारा बाजार समितीत तर १५ दिवसांत क्विंटलमागे ५०० ते ६०० रुपये भाव घसरलाय.
सध्या अडीच हजारांपर्यंत कांद्याला दर मिळत आहे. तर लसूणचा दर स्थिर असून मिरची आणि गवार मात्र, तेजीत आहे. जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली आहे.
त्यामुळे भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागलाय. तरीही सध्या भाज्यांची आवक अजूनही टिकून आहे. पण, पुढील महिन्यापासून आवक कमी झाल्यास दरात वाढ होऊ शकते.
सातारा बाजार समितीत तर जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रासह अन्य राज्यातूनही शेतमाल विक्रीसाठी येतो. शुक्रवार वगळता दररोज खरेदी-विक्री होते. आवकच्या प्रमाणात दर निघतात.
बाजार समितीत सध्या उन्हाळी कांद्याची आवक होऊ लागली आहे. यामुळे दरात उतार येत चालला आहे. १५ दिवसांपूर्वी क्विंटलला ३ हजार १०० रुपयापर्यंत दर निघत होता. पण, त्यानंतर टप्प्याटप्प्याने दरात उतार येत गेला.
सध्या ५०० पासून अडीच हजारांपर्यंत भाव मिळत आहे. तसेच आवकही टिकून आहे. लसणाचा दर स्थिर आहे. क्विंटलला ६ ते १० हजारापर्यंत दर मिळत आहे. सातारा बाजार समितीत मध्यप्रदेशसह अन्य राज्यातून लसणाची आवक होते.
तसेच सध्या स्थानिक शेतकऱ्यांचा लसूणही बाजारात येऊ लागलाय. यामुळे दरात उतार आहे. तर लसणाची किरकोळ विक्री ७५ ते १०० रुपये किलोने होत आहे.
अधिक वाचा: ज्या दिवशी लिलाव त्याच दिवशी पट्टीचे पैसे; महाराष्ट्रात नावारूपाला येतंय हे कांद्याचे मार्केट