Join us

Kapus Bajar Bhav : यंदा कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत.. उत्पादन अन् भावही घटले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 10:24 AM

राहुरी शहरासह तालुक्यात कापसाला क्विंटलला तीन हजारांपासून सहा हजार पाचशे रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. पावसामुळे उत्पादनातही प्रचंड प्रमाणात घट झाली आहे.

राहुरी : राहुरी शहरासह तालुक्यात कापसाला क्विंटलला तीन हजारांपासून सहा हजार पाचशे रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. पावसामुळे उत्पादनातही प्रचंड प्रमाणात घट झाली आहे. शेतातून कापूस चोरीच्याही घटना घडत आहेत. यामुळे उत्पादक बेजार झाले आहेत.

यावर्षी समाधानकारक भाव मिळेल. या अशाने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड केली आहे. खर्च २५ ते ३० हजारांच्या आसपास झाला आहे. वेचणीला किलोला ८ ते १० रुपये मागितले जात आहेत.

खर्च पाहता क्विंटलला नऊ ते दहा हजार रुपयांचा भाव मिळणे अपेक्षित आहे. पावसामुळे ३० ते ३५ टक्के नुकसान झाले आहे. एकूणच सर्व विचार करता ८ ते ९ हजारांचा भाव मिळणे अपेक्षेत होते. प्रत्यक्षात या आशेवर पाणी फेरले आहे.

पावसामुळे तीस ते पस्तीस टक्के पिकाचे नुकसान झाले आहे. उत्पादन घटल्याने १० ते १२ क्विंटल कापूस मिळणे मुश्कील झाले आहे. खर्च व उत्पादनाचे गणित जुळेनासे झाले आहे. - आबासाहेब म्हसे, उत्तम वराळे. शेतकरी

सध्या कापसाच्या मिल बंद आहेत. दसऱ्यानंतर त्या सुरु होतील. मिल चालू झाल्यानंतरच कापसाला भाव वाढण्याची शक्यता आहे. तोपर्यंत भाव वाढतील की नाही हे सांगणे आता तरी शक्य नाही. - राजेंद्र कोकाटे, कापसाचे व्यापारी

टॅग्स :कापूसपीकशेतकरीशेतीबाजारमार्केट यार्डपाऊस