Kapus Kharedi : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) वतीने कापूस खरेदी (Kapus Kharedi) गुंडाळण्यात आली असून, शेतकऱ्यांकडे अद्यापही जवळपास १० ते १५ टक्के कापूस शिल्लक आहे. हा कापूस (Kapus) आता विक्री कुठे करायचा? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांतून ओरड सुरू झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यात हिंगोली शहराजवळील लिंबाळा (मक्ता), वसमत तालुक्यातील हयातनगर फाटा, औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार आणि शिरडशहापूर या ठिकाणी 'सीसीआय'च्या (CCI) वतीने कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. (Kapus Kharedi)
प्रारंभी या केंद्रांवर ७ हजार ५२१ रुपये प्रतिक्विंटल कापसाला भाव देण्यात आला. खासगी जिनिंगच्या तुलनेत भाव वाढवून मिळाल्यामुळे हंगामाच्या प्रारंभापासूनच शेतकऱ्यांचा कल सीसीआय (CCI) केंद्राकडे राहिला. त्यामुळे केंद्रांवर गतवर्षीच्या तुलनेत यंदा कापसाची जास्त खरेदी विक्री झाली.
जानेवारी, फेब्रुवारीत तर खरेदी केलेला कापूस ठेवण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने केंद्रांवरील खरेदी बंद ठेवण्याची वेळ आली होती.
सिंचनक्षेत्र भागातील शेतकऱ्यांकडे अजूनही १० ते १५ टक्के कापूस (Kapus) शिल्लक आहे. परंतु, सीसीआयने खरेदी गुंडाळल्याने या शेतकऱ्यांची एकप्रकारे कोंडी झाली आहे. या कापूस उत्पादनकांना आता खासगी जिनिंगमध्ये कापूस विक्री करावा लागणार आहे.
जानेवारीपासून १०० रुपयाने भाव कमी
* डिसेंबरच्या शेवटपर्यंत कापसाचे उत्पादन दर्जेदार असते. त्यामुळे सीसीआयच्या वतीने डिसेंबरच्या शेवटपर्यंत ७ हजार ५२१ रुपये क्विंटलने कापसाची खरेदी करण्यात आली.
* जानेवारीत मात्र किडीचा प्रादुर्भाव झाल्याने कापसाचा दर्जा खालावला. त्यामुळे क्विंटलमागे शंभर रुपयाने भाव कमी करण्यात आला होता. ७ हजार ४२१ रुपये प्रतिक्विंटलचा भाव १५ मार्च रोजी कापूस खरेदी केंद्र बंद होईपर्यंत देण्यात आला.
शिरडशहापूर येथे सर्वाधिक खरेदी
जिल्ह्यातील 'सीसीआय'च्या चार केंद्रांपैकी औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील केंद्रावर यंदाच्या हंगामात सर्वाधिक ६७ हजार ३१ क्विंटल ३५ किलो एवढ्या कापसाची खरेदी झाली, तर सर्वांत कमी जवळा बाजार येथील केंद्रावर २७ हजार ९४१ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला.
शेतकऱ्यांत नाराजी
सीसीआयच्या केंद्रांवर शेतकऱ्यांच्या कापसाचे शेवटचे बोंड खरेदी करण्यात येईल, असे सांगण्यात येत होते. सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे जवळपास १० ते १५ टक्के कापूस शिल्लक आहे. असे असताना सीसीआयने कापूस खरेदी बंद केली आहे. परिणामी, कापूस उत्पादक शेतकऱ्यांत नाराजीचा सूर व्यक्त होत असून, मार्चअखेर खरेदी केंद्र सुरू ठेवायला हवे होते, असा सूर उमटत आहे.
सीसीआय केंद्रांवर झालेली कापूस खरेदी (क्विंटलमध्ये)
हिंगोली | ४०,५०० |
वसमत | ५०,००० |
शिरडशहापूर | ६७,०३१.३५ |
जवळा बाजार | २७,९४१ |