करमाळा: कृषी उत्पन्न बाजार समितीत उडदाचे लिलाव सुरळीतपणे सुरू आहे. मंगळवारी ८००० क्विंटल इतकी आवक होऊन ६५०० ते ८००० पर्यंत उडदाला दर मिळाला आहे.
चालू हंगामात तब्बल २५००० क्विंटल आवक झाल्याची माहिती बाजार समितीच्या उपसभापती शैलजा मेहेर यांनी दिली. करमाळा बाजार समितीमध्ये विक्रीस आलेल्या शेतमालाचे लिलाव उघड पद्धतीने शेतकऱ्यांच्या समक्ष शेतमालाची प्रतवारी करून केले जातात.
शेतमाल विक्रीस शेतकऱ्यास लिलावातील दर मान्य असल्यास शेतकऱ्याची संमती घेतली जाते व त्यानंतर त्वरित मापे व २४ तासांच्या आत त्यांनी विक्री केलेल्या शेतमालाची पट्टी दिली जाते. यावर बाजार समितीचे कडक नियंत्रण आहे.
शेतमालाचा भाव बाजार समिती ठरवत नाही. एफएक्यू दर्जाच्या शेतमालाला हमीभावापेक्षा जादा दर दिला जाईल याकडे बाजार समितीचा कटाक्ष आहे. नॉनएफएक्यू दर्जाचा शेतमाल शेतकऱ्यांच्या संमतीनेच विक्री करणेबाबत अडते व्यापाऱ्यांना बाजार समिती प्रशासनाकडून सूचना दिलेल्या आहेत.
चालू खरीप हंगामामध्ये करमाळा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळपास २३५०० हेक्टर इतक्या क्षेत्रावर इतक्या क्षेत्रावर उडदाची लागण झाल्यामुळे व योग्य वेळी पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उडदाचे उत्पादन होऊन आवक मार्केट यार्डामध्ये सुरू झालेली आहे.
चालू हंगामातील उडिदाच्या बाजारभावाचे अवलोकन केले असता प्रतवारीनुसार किमान ६००० पासून ८७०० पर्यंत प्रति क्विंटल बाजारभाव मिळालेला आहे. रोजच्या सरासरी दराचा विचार करिता हमीभावाने दर उडदाला मिळत आहेत.
रात्री उशिरापर्यंत शेतमाल विक्री प्रक्रिया
■ बाजार समित्यांसह राज्यभरातील बाजार समित्यांमधील आवक व दराचे अवलोकन केले असता करमाळा बाजार समितीत उडदाला चांगला दर मिळत असल्याचे दिसून येत आहे.
■ मार्केट यार्डमधील अडते, खरेदीदार व्यापारी व हमाल तोलारांची संख्या याचा विचार करिता उडदाच्या आवकचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने लिलाव व मापे या प्रक्रियेस थोडा विलंब होत असला तरी रात्री उशिरापर्यंत संबंधित सर्व घटक शेतमाल विक्रीची प्रक्रिया पूर्ण करीत असल्याचे देखील मेहेर यांनी सांगितले.