Join us

Kerla Onion Rates : केरळात कांद्याला मिळतोय देशातील सर्वाधिक दर! तामिळनाडूत सर्वांत कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 2:55 PM

India Onion Rates : महाराष्ट्रातील कांद्याला दर नसल्याने शेतकरी हतबल आहेत. तर देशातील विविध बाजार समित्यात कमीजास्त दर मिळताना दिसत आहे.

Latest Onion Rates : केंद्र सरकाने कांद्यासाठी ५५० डॉलरचे निर्यातमूल्य आणि ४० टक्के निर्यातशुल्क लागू केल्यामुळे कांद्याच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. तर देशांतर्गत कांद्याचे दर पडले आहेत. त्यामुळे मागच्या अनेक दिवसांपासून देशभरातील शेतकरी हतबल झाले आहेत. दुसरीकडे केरळ राज्यांत कांद्याला चांगला दर मिळत असल्याचं दिसून येतंय. तामिळनाडूमध्ये सर्वांत कमी दर मिळत आहे. (All India Onion Rates Today)

दरम्यान, देशभरातील बाजार समित्यांचा विचार केला तर केरळ राज्यात ३ हजार ७०० रूपयांपासून ७ हजार रूपयांपर्यंत प्रतिक्विंटल सरासरी दर मिळताना दिसत आहे. ४ जुलै आणि ५ जुलैच्या आकडेवारीनुसार केरळमधील कोट्टायम या बाजार समितीमध्ये तब्बल ११ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. तर या बाजार समितीमध्ये ५ क्विंटल कांद्याची (Onion) आवक झाली होती. तुरूवअनंतपुरम बाजार समितीमध्ये कांद्याला उच्चांकी दर मिळाल्याचं चित्र आहे. येथे २२ हजार ४० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून देशभरातील कांद्याचा हा उच्चांकी दर मानला जात आहे. 

गुजरात राज्यात संमिश्र दर दिसून येत असून १ हजार ५०० रूपयांपासून ८ हजारांपर्यंत दर मिळताना दिसत आहेत. तर agmarknet या पोर्टलच्या माहितीनुसार देशातील सर्वांत कमी दर हा तामिळनाडू येथे मिळाला आहे. तामिळनाडू राज्यातील तिरूवन्नामलाई, तिरूवारूर, थेनी, धर्मपुरी, नेमककाल, नागपट्टनम, पदुककोटारी या बाजार समित्यांमध्ये केवळ ४० ते ६० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. म्हणजे केवळ ५० पैसे प्रतिकिलो दराने कांदा शेतकऱ्यांना विकावा लागला आहे.  

दरम्यान, पंजाब, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मध्यप्रदेश, बिहार, महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये कांद्याला सरासरी १ हजार ५०० ते ३ हजार रूपये प्रतिक्विंटलच्या आसपास सरासरी दर मिळताना दिसत आहे. या आकडेवारीमधून देशात केरळमध्ये कांद्याला सर्वाधिक तर तामिळनाडू राज्यामध्ये कांद्याला सर्वांत कमी दर मिळत असल्याचं समोर आलं आहे. 

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्ड