अनिल भंडारी
अक्षय्य तृतीयेपासून अनेकजण आंबे खाण्यास सुरूवात करतात. या पार्श्वभूमीवर वाढती मागणी लक्षात घेत बीडच्या बाजारात जवळपास ३० टन आंब्यांची आवक झाली असून, बीडसह जिल्ह्यात व परजिल्ह्यातील लगतच्या गावांमध्ये त्यांची विक्री होत आहे. मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने भावही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत.
फळांच्या बाजारात दोन महिन्यांपासून आंबा विक्रीला उपलब्ध आहे. अनेक कुटुंबांमध्ये अक्षय्य तृतीयेपर्यंत आंबे खात नाहीत. परंतु, पूर्वजांप्रति पूजन केल्यानंतर सुरूवात करतात. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला बाजारात आंब्याची मागणी वाढते. हे लक्षात घेत मागील दोन आठवड्यांपासून आंबे विक्रेत्यांनी नियोजन केले. त्यानुसार दररोज आवक आणि विक्री होत आहे.
यंदा खास अक्षय्य तृतीयेसाठी बाजारात विविध जातीच्या ३० टन आंब्यांची आवक झाल्याचा अंदाज व्यापारी वर्तवतात.
गतवर्षीइतकाच भाव यंदा अक्षय्य तृतीया मराठी वर्षानुसार एक महिना पुढे आली आहे. आंब्याचा मोसम दोन महिन्यांपासून सुरू झाला. त्यामुळे उपलब्धता जास्त आहे. आवक चांगली होत असल्याने आंब्याच्या दरात तेजी नसून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात मिळत आहेत. हे दर गतवर्षी होते तसेच आहेत. - हारून अब्बास बागवान, फळांचे ठोक व्यापारी, बीड.
बाजारात कोणता आंबा काय भाव?
केशर - १२० ते १३०
हापूस कर्नाटक - १५० ते १६०
बदाम - ७० ते ८०
लालबाग - ७० ते ८०
दशेरी - १००
मलिका - ८० - १००
कोकणातला हापूस खातोय भाव पण...
शहरातील फळ विक्रेत्यांनी तसेच हौशी विक्रेत्यांनी थेट रत्नागिरी, देवगड, पुणे, वाशी (मुंबई), कोल्हापूरच्या बाजारातून कोकणचा ओरिजनल हापूस आंबा विक्रीस आणला आहे. आकारानुसार ६०० ते ९०० रुपये डझन दराने त्याची विक्री केली जात आहे. या आंब्याचे वेगळेपण आणि वैशिष्ट्य सांगून विक्री केली जात आहे.
केशरची ५ टन आवक
तेलंगणा तसेच मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, बीड भागातून केशर आंब्याची दररोज ५ टन आवक होत आहे. जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांच्या बागेतील केशर आंबाही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे.
हेही वाचा - हळदीला मिरचीची दिली जोड; सुभाषरावांचे दोन्ही पिकातून उत्पन्न झाले गोड