Join us

एप्रिलनंतर हरभऱ्याचे बाजारभाव कसे असतील? हमीभावापेक्षा जास्त की कमी? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 4:10 PM

हरभऱ्याचा काढणी हंगाम लवकरच मोठ्या प्रमाणावर सुरू होऊन मार्चपासून बाजारात नवीन हरभऱ्याची आवक सुरू होईल. अशा वेळेस हरभरा साठवावा की विकावा याचा प्राथमिक अंदाज शेतकऱ्यांना भविष्यातील किंमतीवरून काढता येईल.

हरभरा हे भारतातील मोठ्या प्रमाणावर उत्पादन होणारे आणि खाल्ले जाणारे डाळवर्गीय पीक आहे. जागतिक पातळीवर एकूण डाळ उत्पादनापैकी २० टक्के हिस्सा हरभऱ्याचा आहे. भारत,ऑस्ट्रेलिया, तुर्की, म्यानमार, पाकिस्तान आणि इथिओपियासह सहा देश जागतिक हरभरा उत्पादनात सुमारे ९० टक्के योगदान देतात.

भारत हा हरभऱ्याचा प्रमुख उत्पादक देश असून जगातील एकूण उत्पादनात भारताचा वाटा सुमारे ७०- ७५ टक्के आहे. भारतातील एकूण डाळ उत्पादनापैकी ४०-५० टक्के हिस्सा हरभऱ्याचा आहे. देशभरात हरभऱ्याचा वापर डाळ व बेसन या दोन्ही स्वरूपात केला जातो.

मार्च ते मे हा हरभऱ्याचा प्रमुख विक्री हंगाम असतो. चालू वर्ष जानेवारी २०२३-२४ मधील हरभऱ्याची आवक मागील वर्षाच्या तुलनेत थोडी कमी झालेली दिसून येत आहे. जानेवारी २०२४ मध्ये ती ०.५ लाख टन इतकी आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत ०.८ लाख टन इतकी होती. 

उत्पादनाचा अंदाजहरभरा हे रब्बी पिक असून त्याची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर व काढणी मार्च ते एप्रिल या दरम्यान केली जाते. भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार सन २०२२-२३ मध्ये हरभऱ्याचे उत्पादन सुमारे १३६.३ लाख टन होण्याची शक्यता आहे जे मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास सारखेच असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रातील २०२१-२२ मधील उत्पादन २७.२ लाख टनांवरून सन २०२२-२३ मध्ये ३६.३९ लाख टनांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

पूर्वीच्या किंमतींचा आढावाऑक्टोबर २०२२ पासून हरभऱ्याच्या किंमती वाढत आहेत. ऑगस्ट २०२३ नंतर, त्या सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा जास्त आहेत. मागील तीन वर्षातील लातूर बाजारपेठेतील हरभऱ्याच्या एप्रिल ते जून मधील सरासरी किंमती खालीलप्रमाणे:एप्रिल ते जून २०२१: रु. ४,८४४/क्विंटलएप्रिल ते जून २०२२: रु. ४,५२५/क्विंटलएप्रिल ते जून २०२३:रु. ४,८१०/क्विंटल

सध्याच्या रब्बी हंगामासाठी हरभऱ्याची सरकारने जाहीर केलेली किमान आधारभूत किंमत रु. ५३३५/क्विंटल आहे.

एप्रिल ते जून असे असतील दरमागील वर्ष २०२१-२२ च्या तुलनेत २०२२-२३ मध्ये निर्यात वाढलेली आहे, तर आयात कमी झालेली आहे. लातूर बाजारातील संभाव्य किंमती एप्रिल ते जून २०२४ दरम्यान रु. ५,२०० ते ५,८०० रुपये प्रति क्विंटल राहण्याची शक्यता बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्ष, पुणे यांनी वर्तविली आहे. सदर संभाव्य अंदाज हा FAQ ग्रेड च्या हरभऱ्यासाठी आहे.

(टीप : स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत कृषी  विभागाच्या बाजार माहिती विश्लेषण व जोखीम व्यवस्थापन कक्ष, पुणे यांनी हा अंदाज वर्तविला असून तो केवळ संदर्भासाठी दिलेला आहे. आपल्या भागातील बाजार, हवामान परिस्थिती व उत्पादन यामुळे त्यात बदल होऊ शकतो. शेतकऱ्यांनी स्थानिक परिस्थितीचा विचार करून व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानेच निर्णय घ्यावा.)

अधिक माहितासाठी संपर्कबाजार माहिती विश्लेषण व जोखीम व्यवस्थापन कक्ष, पुणेमा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पएम.एस.एफ.सी बिल्डींग, २७० भाम्बुर्डा, नारायण एस.बी.मार्ग, सिंबायोसिस कॉलेज, गोखले नगर, पुणे ४११०१६फोन: ०२०-२५६५६५७७, टोल फ्रीः १८०० २१० १७७०

टॅग्स :हरभराबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरीशेती क्षेत्र