कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी गुळाचे दर घसरल्याने शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडले. गुळांनी भरलेली वाहने समितीच्या दारात लावून शेतकऱ्यांनी किमान चार हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळावा, असा आग्रह धरला.
सभापती अॅड. प्रकाश देसाई यांनी बैठक घेऊन शेतकरी व व्यापारी यांच्यामध्ये मध्यस्थी केल्यानंतर आज, मंगळवारपासून सौदे पूर्ववत करण्याचा निर्णय झाला.
जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून गुन्हाळघरे सुरू झाली आहेत. साखर कारखान्यांचा गळीत हंगामाने अद्याप गती न घेतल्याने बाजार समितीत गुळाची आवक चांगली आहे.
रविवारी सुटी असल्याने सोमवारी गुळाची आवक वाढली होती. सकाळी नऊ वाजता सौदे सुरू झाले, पण शेतकऱ्यांना अपेक्षित दर न मिळाल्याने सौदे बंद पाडले. सरासरी प्रतिक्विंटल ३८०० रुपये दर मिळत असल्याने शेतकरी संतप्त झाले.
त्यांनी गुळाने भरलेली वाहने समितीच्या दारात लावून त्यानंतर, सभापती अॅड. प्रकाश देसाई, ज्येष्ठ संचालक भारत पाटील-भुयेकर, सचिव जयवंत पाटील यांनी शेतकऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली.
व्यापाऱ्यांशी दराबाबत चर्चा केली. आवक जास्त आणि मागणी कमी असल्याने दर घसरल्याचे सांगण्यात आले. इतर बाजारपेठेच्या तुलनेत चांगला दर देण्याची ग्वाही व्यापाऱ्यांनी दिल्यानंतर आजपासून सौदे सुरू करण्याचा निर्णय झाला.
सोमवारची आवक
आवक | दर प्रतिक्विंटल |
१० हजार ७९० रवे | ३७०० ते ३८०० |
१ किलो ५१७८ बॉक्स | ३६०० ते ४१०० |
गुळाच्या दरावरून सौदे काढू नये, अशी मागणी शेतकऱ्यांची होती. पण, व्यापारी व शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आजपासून सौंदे पूर्ववत सुरू होतील. - अॅड. प्रकाश देसाई (सभापती, बाजार समिती)