कोल्हापूर : 'कोल्हापुरी गुळा'ला परदेशात मागणी असली तरी त्या पटीत निर्यात होत नाही. याबाबत जागृती नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अनास्था दिसत असून, वर्षभरात जेमतेम ७५०० क्विंटल गूळ निर्यात झाला आहे.
चांगल्या प्रकारचे उत्पादन घेऊन ब्रेण्डिंग केले तर निर्यातदारांच्या आडून न जाता थेट निर्यात करण्याची क्षमताही येथील शेतकऱ्यांमध्ये आहे. यासाठी बाजार समितीने गूळ निर्यातीबाबत पुढाकार घेण्याची गरज आहे.
गुऱ्हाळघरांचा जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख होती. गावागावात गुऱ्हाळघरांच्या चिमण्या पेटलेल्या दिसत होत्या, पण कालांतराने साखर कारखान्यांची संख्या वाढत गेल्याने गुऱ्हाळघरे कमी होऊ लागली.
अलीकडील पाच-सात वर्षात ही संख्या खूप कमी झाली. एकीकडे साखर कारखान्यांकडून उसाला निश्चित भाव मिळू लागला, त्या पटीत गुळाला दर नसल्याने शेतकऱ्यांनी पाठ फिरवली.
बाजारपेठ व ग्राहक झपाट्याने बदलत असताना शेतकरी मात्र पारंपरिक गूळ निर्मितीतच अडकला आहे. काळानुरूप शेतकऱ्यांनी बाजारपेठ शोधणे व त्यासाठी बाजार समितीने पुढाकार घेणे अपेक्षित होते. पण तसे घडताना दिसत नाही.
परदेशात 'कोल्हापुरी' गुळाला चांगली मागणी आहे. पण त्या पद्धतीचा गूळ तयार करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत नाही. गेल्या वर्षभरात अमेरिका, इंग्लड, ऑस्ट्रेलियासह आखाती देशांत कोल्हापूर येथून गूळ निर्यात होतो.
शेतकऱ्यांकडून घेतलेला गूळ पुणे व मुंबईतील निर्यातदारांकडून परदेशात पाठवला जातो. गेल्या वर्षभरात केवळ ७५०० क्विंटल म्हणजेच साडेसात टन गुळाची निर्यात झाली आहे.
अमेरिकेत १६० रुपये किलो गूळ अमेरिकेत आयात शुल्क १०० टक्के असल्याने गुळाचा भाव अधिक आहे. साधारणतः १६० रुपये किलोपर्यंत दर आहे. त्या तुलनेत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया येथे १०० ते ११० रुपये किलोपर्यंत गुळाचा दर आहे. त्यापेक्षाही कमी दर आखाती देशांत पाहायला मिळतो.
कर्नाटक गुळाची सर्वाधिक निर्यातकोल्हापुरी गुळापेक्षा कर्नाटक गुळाची निर्यात अधिक होते. कर्नाटकातील गूळ कोल्हापूर मार्केटमध्ये पॅकिंग करून निर्यात होतो. मग येथील गुळाला अडचण काय? याचे उत्तर बाजार समितीने शोधण्याची गरज आहे.
चॉकलेट, पावडरला अल्प प्रतिसादगुळाचे अर्धा, एक, पाच व दहा किलोचे रवे निर्यात होतात. त्याशिवाय गुळापासून तयार केलेली चॉकलेट, पावडरही निर्यात होते. पण त्याला कमी प्रतिसाद आहे.
कोल्हापुरी गूळ निर्यातीला चांगली संधी आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी माल तयार केला तर निश्चित यश मिळू शकेल. - निमेश वेद, गूळ व्यापारी