Join us

शिवारात हिरव्या चाऱ्याचा अभाव; टंचाईमुळे उसाला ३२०० चा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2023 9:35 AM

चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. मका, कडवळ चाऱ्याचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे हिरवा चारा म्हणून उसाचा वापर होऊ लागला आहे.

पावसाळा सुरू होऊ तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी पंढरपूर तालुक्यात म्हणावा असा पाऊस पडला नाही. यामुळे तालुक्यात चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. मका, कडवळ चाऱ्याचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे हिरवा चारा म्हणून उसाचा वापर होऊ लागला आहे. साखर कारखाने उसाला प्रतिटन २५०० रुपये दर देत आहेत. मात्र, पशुपालकांकडून उसाला ३२०० रुपयांचा भाव मिळत असल्याने ऊस उत्पादक शेतकरी चारा म्हणून उसाची विक्री करू लागल्याचे दिसून येत आहे.

पंढरपूर तालुक्यात दीड लाखांपेक्षा अधिक जनावरांची संख्या आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतातील पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेतकरी पशुधन सांभाळत आहेत. सध्या दुधाला चांगली मागणी असून दरही मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे दररोज हजारो रुपये येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा ओढा दुग्ध व्यवसायाकडे वाढला आहे, लाखो रुपये खर्चून शेतकऱ्यांनी जनावरांची खरेदी केली आहे. मात्र, मागील तीन महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्याने हिरवा चारा मिळणे दुरापास्त झाले आहे.

त्यामुळे चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी चारा म्हणून ऊसाचा वापर करू लागला आहे. चाराटंचाईमुळे पशुपालकांकडून उसाला ३२०० रुपये प्रतिटन दर मिळत असल्याने ऊस उत्पादक शेतकरी आपल्या शेतातील ऊस विक्री करू लागल्याचे पाहावयास मिळत आहे. साखर कारखान्यांना २५०० रुपये दराने ऊस देऊनही बिल मिळण्यास मात्र सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे.

सध्या पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ या तीन तालुक्यात चारा टंचाई भासत आहे. चारा नसल्याने जनावरांचे हाल होत आहेत पशुखाद्यांचे दर वाढल्याने ते खरेदी करणे शेतकयांना परवडत नाही. शासनाने चारा डेपो सुरू केला असता तर चायाची टंचाई भासली नसती, अशी चर्चा शेतकऱ्यांतून होत आहे. 

दररोज ७० ते ८० गाड्या उसाची विक्रीदिवसेंदिवस पशुखाद्याच्या किमतीत वाढ होत आहे. त्यातच मका, कडवळ आदी हिरवळीचा चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे पंढरपूर बाजार समिती येथे दररोज ७० ते ८० गाड्या ऊस घेऊन विक्रीसाठी येत असल्याचे दिसत आहे. जनावरे सांभाळणे गरजेचे असल्याने पशुपालकांचा चारा म्हणून ऊस खरेदीकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :ऊसपीकपीक व्यवस्थापनशेतकरीदूधगायशेतीसोलापूरबाजारमार्केट यार्ड