नंदुरबार जिल्ह्यात ऑक्टोबरपासून बाजारात आलेल्या मिरची उत्पादनाने शेतकरी आणि व्यापाऱ्यांना सुगीचे दिवस आणले होते. परंतु नोव्हेंबर अखेरीस दोन दिवस आणि गेल्या आठवड्यात एक दिवस आलेला पाऊस आणि सतत १० दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण यामुळे मिरची उद्योगाचे सुगीचे दिवस हरवले आहेत. गत १० दिवसांत मिरची खरेदी- विक्री थांबल्याने १५ कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याने मिरची उद्योगावर अवकळा आहे, व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली ३० हजार क्विंटल मिरची पावसात ओली झाल्याने खरेदीबाबत व्यापारी अनुत्सुक आहेत.
परिणामी शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाल्याने शेती पीक उत्पादनात घटीचे संकेत होते. परंतु दुष्काळी स्थितीतही मिरचीने तग धरल्याने ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत बाजारात ३० हजार क्विंटल आवक झाली होती.
नोव्हेंबर महिन्यात ही आवक १ लाख क्विंटलकडे मार्गक्रमण करत असतानाच दोन दिवस अवकाळी पाऊस आल्याने व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली मिरची पाण्यात गेली होती. ही मिरची सुकवणारी मैदाने ओली असल्याने गत १० दिवसांपासून मिरची खरेदी बंद आहे. यामुळे शेतशिवारात तोड बंद होऊन खराब हवामानामुळे मिरचीवर रोगराई वाढून शेतकऱ्यांच्या नुकसानीला सुरुवात झाली आहे.
नंदुरबार बाजारात यंदा हंगामाच्या प्रारंभीच मिरचीला प्रारंभीच्या प्रतिक्विंटल १ हजार ८०० ते ५ हजार ५२५ रुपयांचा दर मिळाला होता. नोव्हेंबरअखेर या दरांमध्ये वाढ होऊन ३ ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटल झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लहर होती. खरेदी केलेल्या मिरचीला राज्याबाहेरील वाढल्याने गणित सुरू बाजारात मागणी व्यापारी वर्गाचे बेरजेचे होते, बाजारात चांगली स्थिती असताना दोन दिवसांचा पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे बाजारपेठ बंद होऊन नुकसानीला प्रारंभ झाला.
५७ उद्योगांची चाके थांबली
मिरची ओली झाल्याचा सर्वाधिक परिणाम मिरची पावडर तयार करणाऱ्या उद्योगांवर झाला आहे. नंदुरबार शहर आणि परिसरातील ५७ उद्योग सध्या बंद आहेत. हाती असलेला माल पूर्ण संपला आहे. नवीन माल तयार करताना ढगाळ वातारणामुळे माल खराब होण्याची भीती असल्याने त्यांचे कामकाज बंद आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प आहे. हे उद्योग बंद असल्याने अनेकांचा रोजगारही थांबला आहे.
रविवारी केली होती पाहणी
■ एकीकडे शेतकरी आणि व्यापाऱ्यांची डोकेदुखी कमी होत नसताना दुसरीकडे मिरची खरेदी बंद आहे. नंदुरबार बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी रविवारी शहरातील पथारींची पाहणी करून माहिती घेतली होती; परंतु मैदाने ओली असल्याने जुनी मिरची पडून आहे. त्यात नव्याने आलेली मिरची खरेदी करून सुकवण्यासाठी जागाच नसल्याने आणखी तीन दिवस थांबण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे बुधवारनंतर मिरची खरेदी प्रत्यक्षात सुरू होणार आहे.
सूर्यप्रकाशाचीही प्रतीक्षा
■ नंदुरबार बाजारात पाऊस येण्यापूर्वी व्यापारी वगनि ३० हजार क्विंटल मिरचीची खरेदी केली होती. ही
मिरची पथारीवर सुकवण्यासाठी टाकली होती. दरम्यान, पावसामुळे मिरची पूर्णपणे खराब होऊन त्यात डाग आले आहेत. हा माल सुकवण्यासाठी लागणारा सूर्यप्रकाशही मुबलक नसल्याने व्यापारी वर्गाची पुरती गैरसोय होत आहे. शहरातील बहुतांश मैदानांवर मिरची अद्यापही झाकून ठेवण्यात आली आहे. त्याखालील जमीन ओली असल्याने मिरची सुकण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. वातावरणात आणखी बदल झाल्यास खराब झालेली मिरची व्यापाऱ्यांना अडचणीची ठरणार आहे.
जिल्ह्यात तीन हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे अवकाळीमुळे नुकसान झाले आहे. यात ७०० पेक्षाअधिक क्षेत्र हे मिरचीचे आहे. मिरचीची झाडे पाण्यात गेल्याने त्यावर लगडलेल्या मिरच्या तोडण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत, काही ठिकाणी जमिनीतील ओलावा कमी झाला असला तरीही मिरची तोड करून तिचा साठा करण्याशिवाय पर्याय नाही, यातून पुन्हा पाऊस आल्यास साठा केलेली मिरची खराब होणार आहे. झाडावर आलेली मिरचीवर कीटकांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने समस्यांमध्ये वाढ होत आहे.