गेल्या तीन महिन्यांपूर्वी चाळीत साठवणूक केलेला उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात खराब होऊ लागला आहे. त्यामुळे मिळेल तो बाजारभाव पदरात पाडण्यासाठी बहुतांश कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस काढल्याने मालेगाव तालुक्यातील उमराणे येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार सप्ताहातील अवघ्या चार दिवसात समितीत सुमारे १ लाख क्विंटल आवक झाली, तर बाजारभाव किमान ५०० रुपये ते १७५१ रुपयांपर्यंत होते.
कांद्याचे वास्तव
कसमादे पट्ट्यातील नगदी पीक असलेल्या उन्हाळ कांद्याला यंदा सुरुवातीपासूनच ग्रहण लागले असून, ऐन कांदा काढणीच्या एक महिना आधीच म्हणजे मार्च महिन्यात गारपीट व अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. परिणामी गारपीट क्षेत्रातील कांदा शेतातच सडला होता. अवकाळी पाऊस झालेल्या क्षेत्रातील कांद्याच्या पोंग्यात पाणी शिरल्याने हा कांदा आतून बाधित झाला होता. परिणामी या कांद्याला बाजारात कवडीमोल दर मिळत होता.
कांदा पिकापासून मिळणारा नफा तर दूरच पण उत्पादन खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी बाधित झालेला हा कांदाही चाळीत जास्त दिवस टिकणार नाही याची खात्री असतानाही साठवून ठेवला. मात्र आता हा साठवणुकीतील कांदा वातावरणामुळे खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बाजारभाव नसतानाही खराब होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारात आणला. त्याची कमी ५०१ रुपये, जास्तीत जास्त १७५१ तर सरासरी १,२०० रुपये दराने व्यापाऱ्यांनी खरेदी केली.
इतर राज्यांत मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु असल्याने तेथील मागणी घटली असून, पाठविलेला कांदा रस्त्यांवर ठिकठिकाणी गाड्यांमध्ये पडून आहे. त्यामुळे भांडवल अडकले असून, खळ्यांमध्येही खरेदी केलेला माल पडून आहे. त्यामुळे मागील आठवड्यात शंभर ते दोनशे रुपयांची घसरण झाली झाली होती.
- संजय देवरे, कांदा व्यापारी, उमराणे
चालूवर्षी गारपीट व अवकाळी पावसामुळे कांदा पीक बाधित झाले होते. सुरुवातीस या कांद्याला बाजारात पाचशे ते सातशे रुपये इतका कवडीमोल बाजारभाव मिळत होता. त्यामुळे आगामी काळात बाजारभाव वाढेल, या अपेक्षेपोटी तीन महिन्यांपूर्वी हा कांदा चाळीत साठवणूक केला होता. परंतु, साठवणूक केलेला हा कांदा सद्यस्थितीत निम्म्याहून अधिक प्रमाणात खराब झाल्याने उकिरड्यावर फेकला असून, उर्वरित कांद्याचीही प्रतवारी घसरल्याने बाजारात अवघ्या आठशे ते नऊशे दराने विक्री झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात होती. नुकसान सोसावे लागले.
- अविनाश विठ्ठल देवरे, शेतकरी