Join us

दिवाळीमुळे लासलगावचे कांदा लिलाव राहणार बंद; मात्र ही आहे पर्यायी व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2023 3:21 PM

कांदा लिलावसाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजारसमितीत कांद्याचे व्यवहार दिवाळीच्या सुटीनिमित्त बंद राहणार आहेत.

लवकरच सुरू होणाऱ्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर देशातील कांद्याची सर्वात मोठी बाजारसमिती असलेल्या लासलगाव बाजारसमितीत कांद्याचे व्यवहार बंद राहणार आहेत. आज दिनांक ७ नोव्हेंबर ते शनिवार दिनांक १८ नोव्हेंबरपर्यंत कांदा लिलाव बंद राहणार असून त्यानंतर रविवारी १९ नोव्हेंबरची साप्ताहिक सुटीनंतर सोमवार दिनांक २० नोव्हेंबरपासून कांदा लिलावाचे व्यवहार पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती बाजारसमितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी ‘लोकमत ॲग्रोला’ दिली आहे.

दर रविवारी बाजारसमितीला सुटी असते, मात्र यंदा दिवाळी आणि रविवार जोडून आल्याने दोन रविवार धरून सुटीचा कालावधी वाढल्याचे श्री. वाढवणे यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात लासलगाव कांदा व्यापारी संघटनेकडून आम्हाला अधिकृत विनंती पत्रही देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कांदा लिलावांना सुटी असली, तरी इतर व्यवहार सरकारी सुटी वगळता सुरू राहणार आहेत.

म्हणून आठ दिवस व्यवहार बंद

लासलगाव बाजारसमितीचा व्याप मोठा असून येथे शेकडो मजूर कामाला आहेत. त्यात परप्रांतीय मजूरांची संख्या जास्त असून दिवाळीचे आठ दिवस ते आपापल्या गावी परततात. त्यामुळे या काळात व्यापाऱ्यांना त्यांना सुटी द्यावी लागत असल्याने कांदा लिलावाचे व्यवहार बंद असतात. दरवर्षी दिवाळीच्या काळात धनत्रयोदशीपासून ते भाऊबीजेपर्यंत मजूरांना सुटी असते, तर बाजारसमितीला दिवाळीची अधिकृत सरकारी सुटी असते. त्यामुळे कांदा व्यवहार बंद ठेवावे लागतात. यंदा दिवाळीच्या आधी व नंतर रविवार जोडून आल्याने सुटीचा कालावधी वाढला आहे.

कुठली बाजारसमिती कधी राहणार बंद

  • लासलगाव बाजारसमितीचे फक्त कांद्याचे व्यवहार : आज दिनांक ७ नोव्हे २३ ते १९ नोव्हेंबर २३
  • निफाड उपबाजारसमिती  कांद्याचे व्यवहार : दिनांक ९ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर २३

दिवाळीतही शेतकऱ्यांनी इथे आणावा शेतमाल

लासलगाव बाजारसमितीतील कांदा व्यवहार सुटीमुळे बंद राहिले, तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, यासाठी लासलगावपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेली विंचूर बाजारसमिती या रविवारची सुटी व दिवाळीची सरकारी सुटी वगळता सुरू राहणार आहे.  रविवार दिनांक १२ रोजी विंचूर उपबाजार समितीला साप्ताहिक सुटी असेल. मात्र सोमवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी बाजारसमितीत कांदा लिलाव सुरू राहणार आहे. तसेच परंपरेप्रमाणे दिवाळी पाडव्याच्या दिवशी म्हणजेच १४ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सत्रात विंचूर बाजारसमितीत मुहुर्तावर कांदा लिलाव होणार असून या दिवशीही शेतकऱ्यांना आपला कांदा विंचूर उपबाजारात सकाळच्या सत्रात विक्रीस आणता येणार आहे. त्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी भाऊबीजेला मात्र विंचूर बाजारसमितील सुटी राहणार आहे.

दरम्यान आज लासलगाव बाजारसमितीत कांदा व्यवहारांना सुटी असल्याने सकाळच्या सत्रात विंचूर बाजारसमितीत आवक वाढली. या ठिकाणी कांद्याच्या 703 नगांची आवक झाल्याची माहिती सहसचिव अशोक गायकवाड यांनी दिली.

टॅग्स :कांदापुणे कृषी उत्पन्न बाजार समितीदिवाळी 2023बाजार