Join us

लासलगाव, पिंपळगावसह नाशिकचे कांदा लिलाव सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 9:48 PM

नाशिक जिल्ह्यातली कांदा कोंडी फुटली असून उद्या दिनांक ३ ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील कांदा लिलाव पुन्हा सुरू होणार आहेत.

आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारलेल्या नाशिक जिल्हा कांदा व्यापारी सदस्यांनी आज सायंकाळी उशीरा संप मागे घेतला असून उद्या दिनांक ३ ऑक्टोबरपासून नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू होणार आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

संप मागे घेतल्यानंतर आता राज्यातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव व पिंपळगाव बसवंत येथील कांदा लिलाव पूर्ववत सुरू होणार आहेत. आज पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर व्यापाऱ्यांनी संप थांबवून लिलाव पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

एकट्या लासलगाव, पिंपळगाव व त्यांच्या उपबाजार समिती असलेल्या सायखेडा, निफाड व विंचूर या ठिकाणी दररोज सुमारे ५० ते ७० हजार क्विंटलची कांदा विक्री होत असते. हे व्यवहार आता पुन्हा सुरू होणार असून कांद्यावर अवलंबून असलेलं या शहरांच्या अर्थचक्राला पुन्हा गती येणार आहे.

गेल्या १२ दिवसांपासून कांदा व्यापाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी पुकारलेल्या लिलाव बंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील सुमारे १००० ते १२०० कोटींची उलाढाल ठप्प झालेली होती.  मुख्य मागणी असलेल्या ४० टक्के निर्यात शुल्क रद्दबाबत केंद्र सरकारकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने बंदच्या भूमिकेवर व्यापारी ठाम होते.

परिणामी  बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव कधी सुरू होतील याबाबत अनिश्चितता असल्याने शेतकरीवर्ग भांबावलेल्या स्थितीत होते. दरम्यान अनंत चतुर्दशीच्या दिवशी लासलगावची उपबाजार समिती असलेल्या विंचूर येथे आणि आज दुसरी उपबाजारसमिती निफाड येथे कांदा लिलाव सुरू झाले आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून विंचूर बाजारसमितीत कांद्याची विक्रमी आवक होत असून दरही टिकून आहेत. या ठिकाणी सरासरी २१०० ते २२०० रुपये प्रति क्विंटल असे दर उन्हाळी कांद्याला मिळत आहेत.

दिनांक ३ ऑक्टोबर रोजी लासलगावच्या मुख्य बाजार आवारात कांदा लिलाव पूर्ववत सुरू होणार आहेत. याशिवाय तेलबिया व भुसार मालाचेही लिलाव सुरू होणार असून शेतकऱ्यांनी त्यांचा माल विक्रीसाठी घेऊन यावा.- बाळासाहेब क्षीरसागर, सभापती, लासलगाव कृषी उत्पन्न बाजारसमिती.

टॅग्स :कांदाबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरी