Join us

तुरीकडून दिलासा सोयाबीनकडून निराशा, आजचे बाजारभाव काय? 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 6:22 PM

कांदा उत्पादक शेतकरी हैराण असताना दुसरीकडे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी देखील घसरत्या दरामुळे हवालदिल झाले आहेत.

एकीकडे कांदा उत्पादक शेतकरी हैराण असताना दुसरीकडे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी देखील घसरत्या दरामुळे हवालदिल झाले आहेत. आजचा तूर आणि सोयाबीनचा बाजारभाव पाहिला असता हिंगोली बाजार समितीत तुरीला प्रति क्विंटल 9902 रुपये दर मिळाला. तर सोयाबीनला प्रति क्विंटल 4441 इतका बाजारभाव मिळाला. म्हणजेच सोयाबीनला शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी भाव मिळाला. 

गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळवले आहे. अनेक पिकांचे दर गडगडल्याने शेतकरी चिंतातुर आहे. तर दुसरीकडे तूर उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे. सद्यस्थित राज्यातील निवडक बाजार समितीमध्ये तुरीचे दर दहा हजार रूपयांवर पार झालेले आहे. आजच्या अहवालानुसार अकोला कृषी बाजार समितीत तुरीला प्रति क्विंटल सरासरी 9 हजार 700 बाजारभाव मिळाला. सोयाबीन चा प्रति क्विंटल चा दर अद्यापही पाच हजाराच्या खालीच असून  शेतकऱ्यांची निराशा होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकीकडे तुरीला चांगला दर मिळत असताना दुसरीकडे सोयाबीनच्या दरात घसरण होत असल्याचे चित्र आहे. 

आजचा तुरीचा दर 

आज दिनांक 25 जानेवारी 2024 च्या आजच्या बाजारभावानुसार अकोला बाजार समितीत आज 2711   क्विंटल तुरीची आवक झाली. त्यानंतर कमीत कमी 7800 भाव मिळाला. तर सरासरी 9700 रुपये भाव मिळाला. हिंगोली बाजार समितीत 505 क्विंटलची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 9455 तर सरासरी 9902 इतका भाव मिळाला. नागपूर बाजार समितीत 4007 क्विंटलची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 8500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. तर सरासरी 9569 रुपये भाव मिळाला. त्यानुसार आज बहुतांश बाजार समित्यांमध्ये दहा हजाराच्या खाली बाजारभाव आल्याचे दिसून आले. तर काही निवडक बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर दहा हजाराच्या वर होते. 

आजचे सोयाबीनचा दर 

तर सोयाबीनचा आजचा बाजारभाव पाहिला असता हिंगोली बाजार समितीमध्ये 831 क्विंटलची आवक झाली. कमीत कमी 4199 इतका भाव मिळाला. सरासरी 4402 इतका प्रति क्विंटलला भाव मिळाला. नागपूर बाजार समितीत 454 क्विंटल पांढऱ्या सोयाबीनची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 4200 रुपये दर मिळाला. तर सरासरी 4369 इतका दर मिळाला. अकोला बाजार समितीत 4890 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 4000 रुपये दर मिळाला. तर सरासरी 4490 इतका दर मिळाला. 

टॅग्स :मार्केट यार्डसोयाबीनकांदाशेती