Join us

यंदाच्या हंगामात 25 लाख क्विंटल कापसाची आवक, कोणत्या बाजार समितीत किती आवक?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 1:59 PM

वर्धा जिल्ह्यातील सातही बाजार समितीमध्ये तब्बल २५ लाख १९ हजार २७० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली.

वर्धा : गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना सुरुवातीपासूनच नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. त्यामुळे सोयाबीन आणि कपाशीच्या उत्पादनात कमालीची घट झाली. असे असतानाही आतापर्यंत वर्धा जिल्ह्यातील सातही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल २५ लाख १९ हजार २७० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली.

हंगामात प्रारंभी पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली. त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांना कर्जाचा खाईत लोटले. यातूनही कसेबसे पीक सावरत शेतकऱ्यांनी हिंमत बांधली. परंतु खोडकीड आणि बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशीचे उत्पादन हिरावून घेतले. सोयाबीनचा तर सुरुवातीलाच सुपडा साफ झाला होता. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पीक काढून शेती रब्बीकरिता तयार केली होती. तसेच कापसाचेही जेमतेम उत्पादन घेऊन शेतकऱ्यांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. 

सोयाबीन आणि कपाशीचे उत्पादन घटल्याने बाजारभाव चांगला मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु शासनाच्या विरोधी धोरणामुळे त्यांच्या या अपेक्षांवर पाणीच फेरले गेले. शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात शेतमाल विकून मोकळे व्हावे लागले. वर्धा जिल्ह्यातील सातही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आतापर्यंत ९ लाख ४९ हजार ३४५.२७ क्विंटल सोयाबीन तर २५ लाख १९ हजार २७०.८ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा जास्त भाव मिळाल्याने त्यांनी बाजार समितीलाच पसंती दिली.

बाजारभाव कसा मिळाला? 

यंदाच्या हंगामात सोयाबीन 9 लाख 49 हजार 345 क्विंटल, कापूस 25 लाख 19 हजार 270 क्विंटल, तूर 40 हजार 216 क्विंटल, चना 3 लाख 66 हजार 341 क्विंटल, गहू 34 हजार 864 क्विंटल अशी आवक झाली. तर कापूस कमीत कमी 6 हजार 300 तर सरासरी 7010 रुपये प्रती क्विंटल, सोयाबीन कमीत कमी 2750 रुपये तर सरासरी 5020 रुपये क्विंटल, तूर कमीत कमी 4500 रुपये तर सरासरी 5400 रुपये क्विंटल, गहू कमीत कमी 2250 रुपये तर सरासरी 2610 रुपये प्रती क्विंटल असं भाव मिळाला. 

कुठल्या बाजार समितीत किती आवक 

दरम्यान वर्षा जिल्ह्यातील सात बाजार समित्यांची स्थिती पाहिली असता सोयाबीनची आवक वर्धा बाजार समितीत 61 हजार 466 क्विंटल, पुलगाव बाजार समितीत 53 हजार 606 क्विंटल, सीदी रेल्वे बाजारसमितीत 11 हजार 948 क्विंटल, हिंगणघाट बाजार समितीत 5 लाख 65 हजार 233 क्विंटल, समुद्रपूर बाजार समितीत 789 क्विंटल, आर्वी बाजार समितीत 61 हजार 466 क्विंटल अशी आवक झाली आहे. कापसाची आवक पाहिली असता वर्धा बाजार समितीत 03 लाख 95 हजार 97 क्विंटल, पुलगाव बाजार समितीत 5 लाख 53 हजार 97 क्विंटल, सीदी रेल्वे बाजारसमितीत 01 लाख 46 हजार 804 क्विंटल, हिंगणघाट बाजार समितीत 8 लाख 27 हजार 398 क्विंटल, समुद्रपूर बाजार समितीत 1 लाख 54 हजार 789 क्विंटल, आर्वी बाजार समितीत 03 लाख 95 हजार 97 क्विंटल अशी आवक झाली आहे.

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीकापूसकॉटन मार्केटमार्केट यार्ड