Join us

कोथिंबीर-मेथीची सर्वाधिक आवक, बाजारभाव मात्र कवडीमोल, जाणून घ्या आजचे बाजारभाव ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 6:30 PM

आज कोथिंबीर आणि मेथीची बाजार समित्यांमध्ये सर्वाधिक आवक झाली. मात्र याच जुड्यांना अपेक्षित भाव मिळाला नाही. 

आजच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज भाजीपाल्यामध्ये गवार, मिरची, तोंडली, मटार आदी शेतमालाला चांगला मिळाल्याचे दिसून आले. दुसरीकडे रोजच्या आहारात असलेली वांगी, टोमॅटो, मेथी, कोथिंबीरसह इतर भाजीपाला पिकाला कवडीमोल बाजारभाव मिळाला. दरम्यान कोथिंबीर आणि मेथीची बाजार समित्यांमध्ये सर्वाधिक आवक झाली. मात्र याच जुड्यांना अपेक्षित भाव मिळाला नाही. 

आज 27 फेब्रुवारी 2024 पणन महामंडळाच्या माहितीनुसार भाजीपाला बाजारभाव पाहिले असता टोमॅटोची आठ हजार क्विंटलहुन अधिक आवक झाली. यात लोकल टोमॅटोसह वैशाली, नंबर 01 अशा वाणांची आवक झाली. आज पनवेल बाजार समितीत नंबर एकच्या टोमॅटोला 2100 रुपयांचा सरासरी बाजारभाव मिळाला. सोलापूर बाजार समितीत सर्वात कमी भाव वैशाली वाणाला केवळ 800 रुपये मिळाला. बटाट्याला प्रति क्विंटलला सरासरी 1200 रुपये बाजारभाव मिळाला. नाशिक बाजार समितीत हायब्रीड भेंडीला प्रति क्विंटल 3665 रुपये बाजारभाव मिळाला. तर फ्लॉवरला 1500 रुपयांचा बाजारभाव मिळाला. पुणे बाजार समितीत गाजराची सर्वाधिक आवक झाली. या बाजार समितीत गाजराला सरासरी 1250 रुपयांचा बाजारभाव मिळाला. 

तर आजच्या बाजार अहवालानुसार कोथिंबीर आणि मेथीची सर्वाधिक आवक झाली. एकट्या पुणे बाजार समितीत कोथिंबीरीच्या जवळपास दीड लाख जुड्या प्राप्त झाल्या. साधारण जुडीमागे केवळ सात ते आठ रुपयांचा बाजारभाव मिळाला. तर पुणे बाजार समितीत तब्बल 77 हजार इतर्की मेथी जुडीची आवक झाली. या बाजार समितीत केवळ मेथी जुडीला 06 रुपये दर मिळाला आहे. तर कोल्हापूर बाजार समितीत क्विंटलमागे 3 हजार रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे. 

टॅग्स :शेतीभाज्यामार्केट यार्डनाशिक