- सुनील चरपे
नागपूर : कांद्यावरील निर्यातबंदी कायम असून, तीन लाख मेट्रिक टनऐवजी ५० हजार मेट्रिक टन कांदा निर्यात केला जाणार असल्याचे केंद्र सरकारने अप्रत्यक्षरीत्या स्पष्ट केले आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्याेग मंत्रालयाने १ मार्चला नाेटिफिकेशन प्रसिद्ध करीत ५० हजार मेट्रिक टन कांदा खासगी निर्यातदारांऐवजी ‘एनसीईएल’ (नॅशनल काे-ऑपरेटिव्ह एक्सपाेर्ट लिमिटेड)च्या माध्यमातून बांगलादेशला निर्यात केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारने १८ फेब्रुवारी राेजी कांद्यावरील निर्यातबंदी उठविल्याची व तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीची घाेषणा केली हाेती. त्यानंतर दाेन दिवसांनी केंद्रीय ग्राहक कल्याण अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे सचिव राेहितकुमार सिंग यांनी निर्यातबंदी कायम असल्याचे व ५०,४०० मेट्रिक टन कांदा निर्यात करणार असल्याचे सांगितले हाेते. वास्तवात, केवळ ५० हजार मेट्रिक टन कांदा निर्यात केला जाणार असून, हा कांदा रमजान महिना सुरू हाेण्यापूर्वी म्हणजे ११ मार्चपर्यंत बांगलादेशात पाेहाेचविणे आवश्यक आहे.
एनसीईएल नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करणार आहे. नाफेडच्या कांदा खरेदीचे अत्यंत वाईट अनुभव आल्याचे व त्यांनी विश्वासार्हता गमावल्याचे नाशिक, पुणे, अहमदनगर व साेलापूर जिल्ह्यातील कांदा उत्पादकांनी सांगितले. एनसीईएलकडे कांदा निर्यातीला लागणाऱ्या काेणत्याही पायाभूत सुविधा नाहीत. एनसीईएलला कांदा खरेदी, पॅकिंग व इतर बाबी पूर्ण करून आठ दिवसांत बांगलादेशात पाेहाेचविणे शक्य नसल्याचे अधिकारी व निर्यातदार सांगतात.
ना कार्यालय, ना सीईओ, ना स्टाॅफ
एनसीईएलची निर्मिती डिसेंबर २०२३ मध्ये करण्यात आली. ‘एनसीडीसी’ (नॅशनल काे-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कार्पाेरेशन)चे सीईओ पंकज बन्सल हे एनसीईएलचे प्रभारी सीईओ आहेत. एनसीईएलला स्वत:चे कार्यालय नाही. त्यांचे मुख्य कार्यालय दिल्लीतील अमूल (आणंद डेअरी)च्या कार्यालयात थाटले असल्याचे एनसीईएलच्या सूत्रांनी सांगितले. वास्तवात, त्यांचे कार्यालय दिल्ली शहरात नसून, अमूलच्या आणंद, गुजरात येथील मुख्य कार्यालयात थाटले आहे. विशेष म्हणजे, त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांचा काेणताही स्टाॅफ नाही, अशी माहिती एनसीईएलच्या सूत्रांनी दिली.
कांदा शिपमेंटसाठी ११ दिवस आवश्यक
बांगलादेशचा सुखसागर कांदा बाजारात येत असल्याने ते दरवर्षी मार्च ते मे या तीन महिन्यात कुणाकडूनही कांदा खरेदी करीत नाही. या वर्षी पावसामुळे त्यांचे कांद्याचे पीक बाजारात यायला किमान १५ दिवस उशीर असल्याने त्यांनी भारताकडून कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यांना रमजान महिना सुरू हाेण्यापूर्वी म्हणजे १२ मार्चपर्यंत नाशिकचा लाल कांदा हवा आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान चार आणि नाशिकमधून बांगलादेशात कांदा पाठविण्यासाठी किमान सात असे एकूण ११ दिवस लागतात. एनसीईएलची आजची स्थिती पाहता एवढ्या कमी काळात ते बांगलादेशात कांदा पाेहाेचवतील, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.