Join us

NAFED Onion Issue : नाफेड कांदा खरेदी घोटाळाप्रकरणी अधिकाऱ्यांची उचलबांगडी, नेमकं प्रकरण काय? 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 7:02 PM

Nashik Onion Issue : नाफेड कांदा खरेदी (nafed onion issue) घोटाळाप्रकरणी दोन अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आल्याचे समजते.

Nafed Onion Issue : नाफेड कांदा खरेदीमध्ये (Nafed Onion Issue) मोठी कारवाई सध्या करण्यात आली आहे. नाफेडच्या कांदा विभागाच्या केंद्रीय प्रमुखांची आता उचल बांगडी करण्यात आली असून खरेदी देखील थांबविण्यात आली आहे. तसेच पुढील दोन दिवसांत नव्याने कार्यकारिणी नेमून कांदा खरेदी सुरू करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रालयातील समिती ही नाशिक (Nashik) दौऱ्यावर होती. या दौऱ्याअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफच्या (NCCF) माध्यमातून सुरू असलेल्या कांदा खरेदीत गैरव्यवहार असल्याचं समोर आलं होतं. यासाठी या केंद्रीय समितीने नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून ज्या ठिकाणी खरेदी सुरू आहे, अशा ठिकाणी भेटी दिल्या. त्या सगळ्या घडामोडीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या दोन अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे समजते आहे. 

तर याबाबत महाराष्ट्र शेतकरी कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, याबाबत अद्यापही अधिकृत अशी माहिती मिळाली नाही. मात्र असं काही झालं असेल तर ते शेतकऱ्यांना दाखवण्याकरता आहे. मात्र आम्ही संघटनेच्या माध्यमातून नाफेड कांदा खरेदी घोटाळ्याची ईडी आणि सीबीआयद्वारे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केलेली आहे. त्याच मागणीचा सारासार विचार करून सरकारने पावले उचलावीत.

काय नेमका हा घोटाळा 

केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत यावर्षी नाफेड आणि एनसीसीएफ या दोन संस्थांमार्फत पाच लाख टन कांदा खरेदी सुरु आहे. या दोन्ही संस्थांकडून प्रत्येकी अडीच लाख टन कांदा खरेदी करण्यासाठी महाराष्ट्रातील काही निवडक फार्मर प्रोडूसर कंपन्या व कंपन्यांचे फेडरेशन यांच्यामार्फत कांदा खरेदी सुरू आहे. ही कांदा खरेदी करताना अनेक फेडरेशन व फार्मर प्रोडूसर कंपन्यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा कांदा न घेता बाजारातून आधीच स्वस्त दरातील कांदा आपल्या गोडाऊनमध्ये साठवून ठेवला. तसेच काही ठराविक व्यापाऱ्यांकडून कमी दरातील कांदा खरेदी करून हाच कांदा सरकारी बफर स्टॉक म्हणून दाखवण्यात आला आहे. 

टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकशेती क्षेत्रशेती