निर्यात खुली झाल्यानंतर कांद्याला आज समाधानकारक भाव मिळाला आहे. लासलगाव बाजार समितीत सकाळ सत्रात उन्हाळ कांद्याला सरासरी 2100 रुपयांचा दर मिळाला आहे. त्यामुळे काही अंशी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून निर्यातबंदी असल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल दरात कांदा विक्री करावा लागत होता. त्यामुळे निर्यात खुली करण्यासाठी शेतकऱ्यांकडून वेळोवेळी केंद्राला साकडे घालण्यात येत होते. अखेर ऐन निवडणुकांच्या रणधुमाळीत केंद्राने काही अटी शर्तीवर निर्यात खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लागलीच बाजार समित्यांमध्ये काही प्रमाणात दर वाढण्यास सुरवात झाली आहे.
आजचे लासलगाव मार्केटचे बाजारभाव
सद्यस्थितीत उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. आज सकाळ सत्रात लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याची अंदाजे 550 क्विंटल आवक झाली. या कांद्याला प्रतिक्विंटलमागे कमीत कमी 800 रुपये ते तर सरासरी 2100 रुपये दर मिळाला. त्यामुळे दुपार सत्रात नेमका किती भाव मिळतोय, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कांदा उत्पादकांपुढे सरकार नरमले; अखेर अटी शर्तींसह कांदा निर्यात खुली, भाव वाढणार का?
निर्यात खुली करण्याचा निर्णय काय?
कांदा निर्यातीसाठी कमीत कमी निर्यात मूल्य ५५० अमेरिकन डॉलर प्रति टन असायला हवे. याचाच अर्थ निर्यातदारांना ४६ ते ४७ रुपये प्रति किलोच्या खाली कांदा विकता येणार नाही. याशिवाय कांद्यावर ४० टक्के एक्स्पोर्ट ड्युटी कायम असणार आहे. मध्यंतरी व्यापाऱ्यांनी आणि निर्यातदारांनी ग्राहक संरक्षण मंत्रालयाला पत्र देऊन ८०० अमेरिकन डॉलर प्रति मे. टन भावाप्रमाणे कांदा निर्यात करण्याची तयारी दाखविली होती.