- सुनील चरपे
नागपूर : राज्य सरकारने शेवटच्या दाण्यापर्यंत म्हणजेच शेतकऱ्यांकडील १४ लाख १३ हजार टन साेयाबीन एमएसपी दराने खरेदी (Soyabean Kharedi) करण्याची घाेषणा केली हाेती. ६ फेब्रुवारीला या खरेदीची मुदत संपली. १५ ऑक्टाेबर २०२४ ते ६ फेब्रुवारी २०२५ या काळात राज्य सरकारने नाफेड व एनसीसीएफच्या माध्यमातून ५ लाख ११ हजार ६५७ नाेंदणीकृत शेतकऱ्यांकडून ११ लाख २१ हजार ३८५ टन साेयाबीन खरेदी केले असले तरी २ लाख ६६ हजार १०० नाेंदणीकृत शेतकऱ्यांकडील साेयाबीन खरेदी (Soyabean market) करण्यात आले नाही.
सन २०२४-२५ च्या हंगामात साेयाबीनचे दर एमएसपीपेक्षा किमान एक हजार रुपये कमी आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने नाफेड व एनसीसीएफच्या (Nafed) मदतीने राज्यात ५६२ खरेदी केंद्र सुरू केले. या केंद्रांवर एकूण ७ लाख ७७ हजार ७५७ शेतकऱ्यांनी साेयाबीन विकण्यासाठी सरकारकडे नाेंदणी केली.
या साेयाबीन खरेदीचा वेग सुरुवातीपासून आजवर अतिशय संथ राहिला. त्यातच ३१ डिसेंबर २०२४ ला खरेदीची मुदत संपली. त्यापूर्वीच बारदाना नसल्याचे कारण सांगून खरेदी बंद करण्यात आली. पुढे या खरेदीला ३१ जानेवारी आणि नंतर ६ फेब्रुवारी अशी दाेनदा मुदतवाढ देण्यात आली. या काळात साेयाबीन खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करणे गरजेचे असताना २.११ लाख टन साेयाबीन कमी खरेदी करण्यात आले. २ लाख ६६ हजार १०० शेतकऱ्यांकडील साेयाबीनचे माेजमाप शिल्लक असताना या खरेदीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे पणन मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
- साेयाबीन खरेदीचे उद्दिष्ट : १४ लाख १३ हजार टन
- एकूण साेयाबीन खरेदी : ११ लाख २१ हजार ३८५ टन
- एकूण नाेंदणीकृत शेतकरी : ७ लाख ७७ हजार ७५७
- साेयाबीन खरेदी केलेले शेतकरी : ५ लाख ११ हजार ६५७
- शिल्लक शेतकरी : २ लाख ६६ हजार १००
साेयाबीन खरेदी
- १) नाफेड : ८ लाख ३६ हजार ७४२ टन
- २) एनसीसीएफ : २ लाख ८४ हजार ६४४ टन
नाेंदणीकृत शेतकरी
नाफेड या संस्थेकडे एकूण ५ लाख ६४ हजार ५२३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यातील ३ लाख ६२ हजार २४२ शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करण्यात आली आहे. तर एनसीसीएफ या संस्थेकडे २ लाख १३ हजार २३४ शेतकऱ्यांची नोंदणी आहे. तर १ लाख ४९ हजार ४१५ शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.