नाशिक : देवळा तालुक्याच्या (Deola Taluka) पश्चिम भागात ओल्या तुरीच्या शेंगांची विक्री (Tur shenga) करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे. परतीच्या पावसामुळे तुरीच्या पिकाला फटका बसत असल्याने आणि अचानक भावात घसरण झाल्याने सध्या या शेंगांना सरासरी ६० ते ७० रुपये प्रतिकिलो प्रमाणे भाव मिळत आहे. शिवाय तुरीच्या शेंगाना थेट गुजरातमधून मधून मागणी वाढत आहे.
मका पिकाला पर्याय म्हणून नाशिकच्या (Nashik) कसमादे पट्ट्यातील बहुतांश शेतकरी दरवर्षी तुरीची लागवड करत असतात. खरीप हंगामातील द्विदल वर्गातील तूर हे पीक तसे दुर्लक्षित होते. परंतु गुजरात राज्यातून तुरीच्या ओल्या शेंगांची वाढती मागणी लक्षात घेऊन कळवण व देवळा तालुक्यातील बरेच शेतकरी तूर पिकाची लागवड करतात.
सहा महिन्यांचे पीक असल्याने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात या तुरीच्या ओल्या शेंगा तोडत त्यांची विक्री केली जाते. दिवाळीच्या पूर्वार्धात या पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळत असल्याने आता बहुतांश शेतकरी या पिकाकडे वळले आहेत.
शेंगांचे दर ७५ टक्क्यांनी घसरले
आठवडाभरापूर्वी तुरीच्या शेंगांना 190 रुपये प्रतिकिलो असा दर मिळत होता. त्यामध्ये सुमारे 75 टक्क्यांनी घसरण झाली आहे. सध्या या शेंगांना सरासरी 55 ते 62 रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. आज बाजार समितीमध्ये लाल तुरीची आवक दिसून आली. यात अमरावती बाजारात क्विंटलमागे कमीत कमी 9 हजार 800 रुपये तर सरासरी 10 हजार 175 रुपये दर मिळाला. तर यवतमाळ बाजारात सरासरी 9700 रुपये आणि नागपूर बाजारात 9350 रुपये दर मिळाला.
गुजरातमध्ये मोठी मागणी
गुजरात राज्यात तुरीच्या ओल्या खास्ट शेंगांना मोठी मागणी असते. कारण तेथे प्रत्येक भाजीत तुरीचे ओले दाणे टाकतात. तसेच या शेंगा उकडून तेथे आवडीने खाल्ल्या जातात. वाटाण्याऐवजी हे दाणे वापरतात. यामधून शेतकऱ्यांना चांगले अर्थार्जन होते, तसेच व्यापारी वर्गालाही यातून दोन पैसे मिळत असल्याने अनेकजण या शेंगांची खरेदी-विक्री करीत रोजगार मिळवताना दिसत आहेत.