Nashik Onion Export : केंद्र सरकारने निर्यात मूल्य हटविल्यानंतर आणि निर्यात शुल्क (Export Duty) कमी केल्यानंतर निर्यातीला सुरवात झाली होती. मात्र काही अडचणीमुळे कंटेनर अडकून पडले होते. अखेर चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कांदा निर्यात सुरळीत झाली आहे. सद्यस्थितीत बाजारभाव (Kanda Market) स्थिर असून आज तात्काळ निर्यात सुरु होण्याची अपेक्षा होती, मात्र यातही चार दिवस गेल्याचे शेतकरी संघटनांनी सांगितले.
केंद्र सरकारने 13 सप्टेंबर रोजी कांद्याच्या निर्यातीवरील साडेपाचशे डॉलरचे किमान निर्यात मूल्य पूर्ण हटवले तर कांद्याच्या निर्यातीवर असलेले निर्यात शुल्क 40 टक्क्यावरून 20 टक्के केले. उशिरा का होईना निर्णय घेतल्याने शेतकरी, व्यापारी, शेतकरी संघटनांनी समाधान व्यक्त केले. मात्र हा निर्णय झाल्यानंतर निर्यातीला अडचणी आल्या. कांदा घेऊन निघालेले कंटेनर जेएनपीटी बंदरावर अडकून पडले. सलग चार दिवस कंटेनर अडकून पडल्याने निर्यात दारांसह शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली. अखेर काल सायंकाळी उशिरा निर्यात सुरळीत झाल्याचे सांगण्यात आले आहे.
नाशिकच्या जानोरी येथील ड्रायपोर्ट येथे कांद्याने भरलेले कंटेनर्स निर्यातीच्या नवीन निकषानुसार कांदा निर्यात करण्यासाठी कस्टम विभागाकडून परवानगी मिळाली नाही, म्हणून निर्यात होण्याच्या प्रतीक्षेत होते. सलग एक वर्षापेक्षा अधिक काळ कांद्यावरील निर्यात बंदी, निर्यात 40 टक्के शुल्क, किमान निर्यात मूल्य आदी अटींमुळे निर्यात खोळंबली होती. तर गेल्या पाच महिन्यांपासून असलेले कांद्याचे साडेपाचशे डॉलरचे किमान निर्यात मूल्य या अशा विविध निर्बंधांमुळे शेतकऱ्यांना आपला कांदा थोडी कवडीमोल दराने विकावा लागला होता. मात्र आता कुठेतरी कांद्याला समाधानकारक दर मिळत असल्याचे चित्र आहे. त्यातच निर्यात संबंधीच्या त्या निर्णयानंतर पुन्हा चार दिवस अडचणींना सामोरे जावे लागले.
एकीकडे शेतकऱ्यांना समाधानकारक दर दर मिळतो आहे. अशा स्थितीत निर्यात होत असलेले कंटेनर अडकून पडणे चुकीचे आहे. कस्टम विभागाकडून नवीन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी वेळखाऊपणा झाल्याने चार दिवस निर्यात सुरळीत होण्यास लागेल. मुळात एक किंवा दोनच दिवसांत या अडचणी दूर होणे अपेक्षित होते. मात्र यातही विलंब लावला. आता कंटेनर अडकलेले नाहीत, निर्यात सुरळीत सुरु झाली आहे. शिवाय बाजारभावावर देखील याचा कुठलाही परिणाम नाही.
- भारत दिघोळे,अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना