जळगाव : अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Amalner Bajar Samiti) वांधा कमिटीने शेतकरी हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांचे तोलाई आणि शेतमालाच्या वाहतूक खर्च परत करण्याचे आदेश समितीने दिले आहेत. बाजार समिती प्रशासन आणि शेतकरी संघटनाच्या वतीने संयुक्त बैठकीत वाहतूक खर्च, तोलाई व वराई परत करण्याचे आदेश देण्यात आले.
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांचा माल मोजल्यानंतर तो माल संबंधित व्यापाऱ्याच्या बाजार समिती बाहेरील गोदाम अथवा शेडपर्यंत माल नेण्यासाठी शेतकऱ्याला सक्ती केली जात होती. शेतकऱ्याला माल बाजार समितीपर्यंत (Amalner Market Yard) आणणे आणि परत गोदामपर्यंत नेणे, असा खर्च करावा लागत होता. या प्रकाराबाबत गावरान जागल्या सेनेने हरकत घेतली होती.
एवढेच नाही, तर शेतकऱ्यांना वाहतूक खर्च प्रति क्विंटल ४० रुपये परत करण्याची मागणी केली होती. त्याचप्रमाणे लिलावाच्या ठिकाणी माल मोजताना फी घेतली जात होती. १७७ रूपये फी न घेण्याची मागणी करण्यात येत होती. यात ५० रूपये तोलकाट्याची व १२७ रूपये वराईच्या फीचा समावेश होता. ही सर्व फी शेतकऱ्यांकडून घेतली जात होती. गोदामापर्यंत माल नेण्याचा खर्चही शेतकऱ्याचा होता.
माल पुन्हा मोजल्यास तोलाई व्यापाऱ्याकडून घेण्यात येणार..!
यापुढे शेतकऱ्यांनी माल मोजताना मापाई दिली असेल, तर वजन काट्यावर पुन्हा माल मोजल्यास तोलाई शेतकऱ्यांकडून न घेता ती व्यापाऱ्याकडून घेण्यात यावी, असेही बैठकीत ठरले. त्याचप्रमाणे यापुढे शेतकऱ्यांचा माल बाजारसमिती बाहेर नेण्यास शेतकऱ्यांची संमती घ्यावी, असेही ठरविण्यात आले. यापूर्वी मालविक्री करताना शेतकऱ्यांवर अन्याय होत होता. सर्व खर्च शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र आता या नवीन नियमामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबणार आहे. शिवाय फिराफिरही होणार नाही.
शेतकऱ्यांनी त्यांची तक्रार असेल, तर माल मोजण्यापूर्वी बाजार समितीकडे करावी.
-डॉ. उन्मेष राठोड, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर
मापाई दिलेल्या शेतकऱ्यांनी तोल काट्यावर तोलाई देऊ नये, ती व्यापाऱ्यांनी द्यावी, असे जनजागृतीपर फलक ठिकठिकाणी लावण्यात येणार आहेत.
- अशोक पाटील, सभापती बाजार समिती, अमळनेर.