एकीकडे लाल कांद्याला कवडीमोल भाव मिळत असताना शेतकऱ्यांनी नव्या जोमाने उन्हाळ कांद्याची लागवड केल्याचे दिसून आले. आता हळूहळू उन्हाळ कांदा देखील लिलावासाठी येऊ लागला आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा बाजार समितीत हंगामातील पहिली उन्हाळ कांद्याची आवक झाली आहे. त्यामुळे आता लाल कांद्याबरोबर उन्हाळ कांदा देखील लिलावासाठी दाखल होण्यास प्रारंभ झाला आहे.
सटाणा येथील कांदा उत्पादक शेतकरी भूषण सोनवणे या शेतकऱ्याचा उन्हाळ कांद्याचा लिलाव झाला आहे. सोनवणे यांनी ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात चार एकर क्षेत्रावर उन्हाळ कांद्याची लागवड केली होती. त्यानंतर जवळपास तीन महिने पंचवीस दिवसांनी त्यांचा कांदा काढणीला आला. सोनवणे यांनी सटाणा बाजार समितीत कांदा लिलावासाठी त्यावेळी या कांद्यास सरासरी 1181 रुपये भाव मिळाला. सोनवणे यांनी सोमवारी दोन वाहनांमधून 65 क्विंटल आवक केली. यावेळी या कांद्याला प्रति क्विंटल 1181 रुपये बाजारभाव मिळाला. तर दुसऱ्या दिवशी 95 क्विंटल कांद्याची आवक झाली. यावेळी 1180 रुपये बाजारभाव मिळाला.
आजचे लाल कांदा बाजारभाव
आज 14 फेब्रुवारी 2024 रोजी लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 11 हजार क्विंटल इतकी आवक झाली तर कमीत कमी 700 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर सरासरी 1230 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर येवला -आंदरसूल बाजार समिती 5 हजार 545 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली तर कमीत कमी दर 300 रुपये मिळाला तर सरासरी 1200 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला. देवळा बाजार समितीत 2 हजार 600 क्विंटल इतकी आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 300 रुपये दर मिळाला. तर सरासरी 1200 रुपये दर मिळाला.