Agriculture News : राज्यातील बाजार समित्यांनी (Market Yard) पुकारलेल्या संपामुळे येथील नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा व भुसार माल खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्णपणे बंद राहिल्याने लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. शनिवार व रविवार या दोन दिवसांच्या साप्ताहिक सुटीनंतर सोमवारी पूर्ववत लिलाव सुरू होतो. मात्र सोमवारी देखील लिलाव बंद होते. अखेर आज मंगळवार पासून लिलाव पूर्ववत झाले असून आज शेतमालाची आवक वाढण्याची शक्यता आहे.
सोमवारी मोठ्या प्रमाणात कांदा (Onion Auction) व भुसार मालाची आवक होते. परंतु, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी पुकारलेल्या बंदमुळे अंतिम टप्प्यात विक्रीस असलेला उन्हाळी कांदा तसेच नव्यानेच काढलेल्या मका माल विक्रीसाठी शेतकऱ्यांची अडचण दिसून आली. मंगळवारी शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक होण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व बाजार समित्यांच्या वतीने सोमवारी लाक्षणिक संप पुकारण्यात आल्याने सर्वच बाजार समितीचे प्रशासन या लाक्षणिक संपात सहभागी होते.
त्यामुळे एकदिवशीय लाक्षणिक बंदमुळे अनेक बाजार समित्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. आजपासून लिलाव पूर्ववतः विक्रीस आवाहन मंगळवारपासून कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज पूर्ववत सुरू होणार असून, शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल बाजार समितीत विक्रीस आणावा, असे आवाहन समितीचे सभापती प्रशांत देवरे, सचिव नितीन जाधव, सहायक सचिव तुषार गायकवाड यांनी केले आहे.
सटाण्यामध्येही दोन कोटींचे नुकसान
सटाणा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व महाराष्ट्र राज्य बाजार समिती पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या परिषदेत राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी बाजार समिती प्रतिनिधींचे कोणतेही म्हणणे व अडचणी, प्रश्न न ऐकता परिषदेच्या स्थळावरून निघून गेले, त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी सोमवारी राज्यातील बाजार समित्यांनी लाक्षणिक संप पुकारला होता. या अनुषंगाने सोमवार सटाणा बाजार समितीचे कामकाज बंद ठेवण्यात आले. परिणामी बाजार समितीमधील कांदा, डाळिंब, भुसार लिलाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते.
चांदवडला दीड कोटीची उलाढाल ठप्प
चांदवड चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती सोमवारी सोमवारी बंद होती. त्यामुळे सुमारे दीड कोटीची उलाढाल ठप्प झाली. यात कांदा व भुसार बाजार बंद होते. त्यामुळे सुमारे दीड कोटीची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती सभापती संजय जाधव व सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे यांनी दिली.
मनमाड बाजार समितीत बंद ..
मनमाड बाजार समितीत सोमवारी बंद पाळण्यात आला. यामुळे कामकाज संपूर्णपणे ठप्प झाले होते. सकाळ सत्रात फक्त भाजीपाला, टोमॅटोचे लिलाव झाले. दुपार सत्रातील धान्य व कांद्याचे लिलाव मात्र झाले नाहीत. दरम्यान मंगळवारपासून बाजार समितीचे व्यवहार पूर्वपदावर येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. मनमाड मार्केट समितीचे सभापती दीपक गोगड यांनी सांगितले की, बंद हा आजच्याच दिवस आहे.
देवळा समिती : एक ते दीड लाखाचे नुकसान
पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सोमवारी पुकारण्यात आलेल्या बंदला देवळा बाजार समितीने पाठिंबा देत शेतीमालाचे लिलाव बंद ठेवण्यात आल्याची माहिती सभापती योगेश आहेर यांनी दिली आहे. बाजार समितीत कांदा व भुसार मालाचे लिलाव बंद असल्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. सद्या कांद्याचे दर तेजीत असल्यामुळे बाजार समितीच्या दैनंदिन उत्पन्नातही चांगली वाढ झाली होती. बाजार समितीचे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी शेतीमालाचे लिलाव नियमित सुरू राहतील.