जळगाव : वाढत्या उन्हामुळे केळी मालाची मागणी वाढली असून सोबतच आवकही वाढलेली आहे. त्यामुळे केळीचे बाजारभाव 1300 रुपये ते 1700 रुपयांपर्यंत स्थिर आहेत. त्यात सध्या निर्यातीत कंटेनरच्या भाड्यात सहा हजारापर्यंत वाढ झालेली आहे.
सध्या तापमानाने चाळिशी ओलांडली असली तरी केळीची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे. रमजान ईद व चैत्र नवरात्रौत्सवानिमित्त केळी मालाची वाढती मागणी पाहता केळी मालाची उचलही मोठ्या प्रमाणात झाली. मात्र दुसरीकडे केळी निर्यातीसाठी जहाजांच्या भाडेवाहतुकीत तिपटीने भाडेवाढ होऊनही रोडावलेल्या निर्यातीतही केळी बाजारभाव किमान 1300 रु. ते 1700 रु. प्रतिक्विंटलपर्यंत आजमितीस केळी भाव स्थिरावले आहेत. बाजारात येण्यास आंब्याला उशीर झाला असल्याने केळी बाजारभाव स्थिर आहेत. जहाजांच्या अनुपलब्धतेमुळे केळी निर्यातीलाही फटका बसला आहे.
केळी निर्यातदार व्यापारी किशोर गणवानी म्हणाले की, आंबा यंदा ४० टक्क्यांनी घटला असल्याने केळी मालाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असताना मागणीही तेवढीच राहिली असल्याने केळीचे बाजारभाव स्थिर आहेत. तर केळी निर्यातदार शेतकरी विशाल अग्रवाल म्हणाले की, आखाती देशांमध्ये जाणाऱ्या जहाजांच्या प्रतिकंटेनर तिपटीने झालेली सहा हजार रुपये पर्यंतची भाडेवाढ केंद्र सरकारने लक्ष घालून कमी केल्यास होणाऱ्या निर्यातवृद्धीमुळे केळी बाजारभाव स्थिर राहण्यास मदत होईल.
उन्हापासून केळीचे संरक्षण
मे महिन्याच्या उन्हाच्या झळा एप्रिलमध्येच जाणू लागल्या आहेत. एप्रिलमध्येच जळगाव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये तापमानाचा पारा ४० च्या वर गेला आहे. यावल तालुक्यात तापमानाची ४३.३ अंश नोंद झाली आहे. आता केळी पीक वाचविण्यासाठी उत्पादकांची कसरत होत आहे. गरम हवा केळी बागेत जाऊ नये म्हणून नेटचा, जुन्या साड्या व कापसाच्या उपटलेल्या काड्या, तुरीच्या झाडाच्या काड्या वापर करून बागेच्या चारही बाजूला लावल्या जात आहे. आता उन्हाळा तीव्र होत असल्याने व पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे केळी बागा वाचविण्यासाठी उत्पादक धडपड करताना दिसत आहे.
केळीचे आजचे भाव काय आहेत?
मुंबई - फ्रुट मार्केटमध्ये क्विंटलमागे सरासरी 3000 रुपये, नाशिक बाजार समितीत भुसावळी केळीला सरासरी 1400 रुपये, नागपूर बाजार समितीत भुसावळी केळीला सरासरी केवळ 525 रुपये, पुणे बाजार समितीत लोकल केळीला सरासरी 1000 रुपये तर यावल बाजार समितीत नंबर एकच्या केळीला सरासरी 1815 रुपये मिळाला.