जळगाव : रावेर तालुक्यातील कोचूर येथील शेतकरी रितेश परदेशी या तरुण शेतकऱ्याने पारंपरिक पद्धतीने केळी लागवड (Banana Market) न करता नवीन तंत्रज्ञान अवगत करून लागवड केलेल्या कांदेबाग केळीला तब्बल ३१३१ रुपये प्रतिक्विंटल असा विक्रमी भाव मिळाला आहे. यामुळे दर्जेदार केळी उत्पादन घेणाऱ्या तरुण शेतकऱ्यांच्या मेहनतीचे चीज झाले आहे.
जळगाव जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा केळी लागवडीची (Banana Cultivation) सुरुवात करणाऱ्या कोचूर गावात पारंपरिक केळी लागवड मिरगाबाग म्हणून केली जात असते. मार्च, एप्रिल, जून जुलै, महिन्यामध्ये लागवड केलेल्या केळीला मृगबाग केळी असे संबोधले जाते. या केळीला ऊन- वारा-वादळ या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसत असतो; परंतु पारंपरिक शेतीला फाटा देत नवीन काही तरी तंत्रज्ञानातून बदल करत नोव्हेंबर महिन्यामध्ये रितेश यांनी कांदेबागची लागवड केली.
देशात नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांसाठी केळीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात देशातील उत्तर भागात अधिक मागणी असते. या बाजारपेठेचा अभ्यास करीत परदेशी यांनी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात ऊतिसंवर्धित रोपांची ५ हजार खोडे लागवड केली होती. नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून केळी बागेला निरोगी ठेवत त्यांनी केळीचे हे उत्पादन घेतले आहे.
आजचे केळी बाजारभाव
आज नाशिक मार्केटमध्ये भुसावळी केळीला क्विंटलमागे कमीत कमी 900 रुपये, तर सरासरी 1500 रुपये दर मिळाला. नागपूर बाजारात कमी कमी 450 रुपये तर सरासरी 525 रुपये, तर पुणे मोशी बाजारात लोकल केळीला कमीत कमी 3 हजार रुपये तर सरासरी 5 हजार रुपये दर मिळाला. तर मुंबई फ्रुट मार्केटमध्ये केळीला सरासरी 4 हजार रुपये दर मिळाला.