जळगाव : यंदा आंबा व टरबूज बाजारात लवकर दाखल झाल्यामुळे केळीच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. गेल्या महिन्यात 1500 ते 2 हजार रुपयांवर असलेले केळीचे दर 800 रुपयांपर्यंत घसरले आहेत. केवळ महिन्याभरातच केळीच्या दरात निम्मेची घसरण झाल्यामुळे केळी उत्पादकांवर संकट कोसळले आहे. दरम्यान, खासगी बाजारात केळीचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांनी फसवणुक टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केळीची विक्री करावी असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
जळगाव जिल्ह्यात एकूण ४६ हजार हेक्टर क्षेत्र केळी पिकाखाली आहे. मात्र, केळीचे दर कधीही स्थिर राहत नसल्याने केळी उत्पादकांना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागत असतो. गेल्या महिन्यात केळीचे दर २ हजार रुपयांवर होते. त्यामुळे शेतात केळी असणारा केळी उत्पादक आनंदीत होता. रमजानच्या पहिल्या आठवड्यातही भावातील तेजी कायम होती. मात्र, अवघ्या महिन्याभरात केळी कापणीवर आली असतांनाच भाव कोसळले.
हे भाव ८०० ते ९०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. एकाचवेळी बहुसंख्य शेतकऱ्यांचा माल मार्केटमध्ये येत असल्याने पुरवठा वाढून मागणी कमी झाल्याने भाव कमी झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तर व्यापाऱ्यांकडूनच कृत्रिम मंदी आणली जात असल्याचा आरोप केळी उत्पादकांकडून केला जात आहे.
...म्हणून घसरले केळीचे भाव
रमजान महिन्यात केळीला मागणी असते. मात्र, रमजान संपत आल्याने निर्यात 75 टक्क्यांनी घटली आहे. भारताकडून 5 ते 10 टक्केच केळीची आयात केली जाते. त्या तुलनेत इक्वाडोर व फिलीपीन्स- वरुन स्वस्त केळीचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होतोय. त्यामुळे- देखील भारतातील केळीची निर्यात घटून, भाव कमी झाले. भारताच्या केळीमध्ये ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ही केळी 20 ते 30 दिवसात पिकते व खराब होते. मात्र, त्यातुलनेत इक्वाडोर व फिलीपीन्सच्या केळीत ग्लुकोजचे प्रमाण कमी असते, 30 ते 40 दिवस साठवून ठेवली जाऊ शकते. उन्हाळ्यात टरबूज व आंबा ही फळं बाजारात आल्याने केळीच्या विक्रीवर परिणाम झाला आहे.
शेतकऱ्यांनी केळीची विक्री बाजार समितीमध्ये करावी
खासगी बाजारात केळीचे भाव घसरल्याने, केळी उत्पादक शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांनी फसवणुक टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केळीची विक्री करावी जेणेकरून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळेल.
-आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव
आजचे केळीचे दर
आजचे केळीचे दर पाहता नागपूर बाजारात भुसावळी केळीला क्विंटल मागे सरासरी 525 रुपये दर मिळाला. पुणे बाजारात लोकल केळीला सरासरी 1100 रुपये, तर पुणे मोशी बाजारात 2750 रुपये दर मिळाला.