Join us

Banana Transport : केळी वाहतुकीला परवानगी, निंभोरा रेल्वेस्थानकावरून 5 जूनपासून वाहतूक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 9:21 PM

Banana News : निंभोरा रेल्वे स्टेशनवरील मालधक्का लवकरच केळीची रेल्वेने वाहतूक (Banana Transport) करण्यासाठी सुरू होणार आहे.

जळगाव : जळगाव  (Jalgaon) जिल्ह्यातील रावेर तालुक्याचे वैभव असलेल्या केळीची रेल्वेने वाहतूक करण्यासाठी निंभोरा रेल्वे स्टेशनवरील माल धक्का लवकरच सुरू होणार आहे. यासाठी तब्बल १२ वर्षे वाट पाहावी लागली. दि. ५ जून रोजी पहिला रेक रवाना होणार आहे. आठवड्यातून दोनवेळा उपलब्धतेनुसार रेल्वे दिल्लीकडे खाना होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून केळी बाजारभाव घसरत (Banana Market ) असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शिवाय केळीची निर्यात अल्प प्रमाणात असल्याने बाजारभावातून दिलासा मिळत नसल्याचे चित्र आहे. अशातच बारा वर्षांपासून थंड बस्त्यात असलेल्या वाहतुकीला अखेर ग्रीन सिग्नल मिळाला आहे. रावेर आणि निंभोरा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील केळी आता रेल्वे वाहतुकीने दिल्लीपर्यंत पोहोचणार आहे. रेल्वेने केळी वाहतुकीस सुरुवात झाल्यास याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. दि. ५ जून रोजी मालगाडी भरण्यास सुरुवात होणार आहे.

आठवड्यातून दोनवेळा रेल्वेच्या उपलब्धतेनुसार रेल्वे रेक भरला जाणार आहे. खऱ्या अर्थाने या १२ वर्षांपासून रिकाम्या पडून असलेल्या रेल्वे मालधक्क्याला नवसंजीवनी मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. यासाठी निंभोरा स्टेशन फळबागायतदार शेतकरी मंडळाचे कडू चौधरी, मोहन पाटील, किरण नेमाडे, विजय पाटील, भूषण चौधरी, पप्पू कोळंबे यांसह शेतकरी बांधवांनी रेल्वे विभागाकडे पत्रव्यवहार केला होता,

मालधक्क्याला नवसंजीवनी 

निंभोरा स्टेशन फळबागातदार शेतकरी मंडळाचे अध्यक्ष कडू धोंडू चौधरी म्हणाले की, निंभोरा रेल्वे स्टेशनवरून केळी वाहतुकीला परवानगी मिळाली आहे. पाच जूनपासून रेल्वेने केळी वाहतुकीला सुरुवात होईल. आमची जुनी मागणी पूर्ण झाली आहे. तर खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, निभोरा स्टेशनचा मालधक्का सुरू व्हावा, ही शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. यासाठी ३-४ वर्षापासून सातत्याने पत्रव्यवहार सुरू होता. याचा फायदा शेतकऱ्यांना होईल आणि भावावरही परिणाम होईल.

टॅग्स :केळीजळगावमार्केट यार्डशेती क्षेत्र