-दिनेश पाठक नाशिक :बांगलादेशातील (Bangladesh Protest) अराजकतेनंतर या देशासह भारताने आपल्या सीमा सील केल्या असून, बांगलादेशमध्ये भारताकडून होत असलेली शेतमालाची आयातही थांबली आहे. बांगलादेश भारताकडून जवळपास ७५ टक्के शेतमाल (Import) आयात करीत असल्याने या घडामोडीने दोन्ही देशांचे नुकसान होणार आहे.
नाशिकमधून (Nashik) दररोज ६० ते ७० ट्रक कांदा दररोज बांगलादेशला रवाना होतो. एका ट्रकमध्ये तीस टन कांदा भरला जातो. मात्र, कांद्याची वाहतूक थांबली असल्याचे कांदा निर्यातदारांनी सांगितले. मागील आठवड्यात बांगलादेशकडे रवाना झालेले कांद्याचे शेकडो ट्रक भारत-बांगलादेश सीमेवर अडकून पडले आहेत. हा कांदा कमी भावात कोलकात्यातच विकण्याची आफत ओढवू शकते.
नाशिक जिल्ह्यातून द्राक्ष अन् कांद्याची मोठ्या प्रमाणात बांगलादेशात निर्यात केली जाते. सध्या द्राक्षाचा हंगाम नसला तरी कांद्याची निर्यात मात्र सुरू आहे. गेल्या तीस ते पसत्तीस दिवसांपासून कांदा कमी झाल्याने निर्यात काहीशी घटली असली, तरी रोजच बांगलादेशच्या दिशेने कांदा भरून ट्रक रवाना होत असल्याचे निर्यातदारांनी सांगितले. साधारण वर्षभर कमी-अधिक प्रमाणात नाशिकचा कांदा हा बांगलादेशला जात असतो. तिकडील कांद्याचा सिझन संपल्याने भारतासह चिनच्या कांद्याचे बांगलादेशची बाजारपेठ व्यापली होती.
मात्र, बांगलादेशातील अराजकतेचा फटका दोन्ही देशांतील कांदा बाजारपेठेला बसला. बांगलादेश भारताकडून बटाटे वगळता तांदूळ, गहू, आटा, डाळी, बेसन, फळे, विशिष्ट प्रजातींचे मासे, भाजीपाला, कांदा व इतर शेतमाल तसेच खाद्यान्न आयात करतात. भारतातून बांगलादेशात होणारी निर्यात किमान ७५ टक्के आहे. सोमवारी दुपारी ४ वाजेपर्यंत भारतातून बांगलादेशात होणारी या शेतमालाची निर्यात सुरू होती. सायंकाळी सीमा सील करण्यात आल्याने ही निर्यात थांबली आहे. त्यात कांद्याची सर्वाधिक निर्यात थाबली आहे. त्यामुळे रोजचे कोट्यवधींचे व्यवहार थांबले आहेत.
५० हजार टनांसाठी होती परवानगी
केंद्र सरकारने मार्च महिन्यात व्यापाऱ्यांना कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली. बांगलादेशला ५० हजार टन कांद्याच्या निर्यातीस परवानगी देण्यात आली होती. ५० हजार टन कांद्याचा टप्पा पार करण्यापर्यंत भारतीतील कांदा निर्यातदार व शेतकऱ्यांची धडपड सुरू होती. यातील ८५ टक्के कांदा एकट्या नाशिक जिल्ह्यातून जाणार होता. मात्र, सध्या सीमा केल्या असल्याने कांद्याचे ट्रक जागच्या जागी थांबले आहेत.
सीमा खुली होण्यासाठी अजून चार दिवस प्रतीक्षा
सीमेवर माल भरून अडकून पडलेले कांदा व इतर शेतीमालाचे ट्रक अजून तीन ते चार दिवस सीमा खुली होण्याची प्रतीक्षा करतील. मात्र, सध्या चार दिवसांनी सीमा खुली होईल, अशी कोणतीच परिस्थिती नसल्याचे मुख्य निर्वा- तदारांनी 'लोकमत'ला सांगितले. त्यामुळे कांद्यासह इतर शेतीमाल कमी भावात सीमेवरील गावांमध्ये किंवा कोलकात्यात विक्री करावा लागू शकतो. मात्र, यामुळे बांगलादेशच्या नागरिकांना या जीवनावश्यक वस्तूच न मिळाल्याने तेथे महागाईचा आगडोंब उसळून सामान्यांचे जीवन अधिक महाग होईल.