- अजय पाटील
जळगाव : बांगलादेशात (Bangladesh Protest) सत्तांतर झाले आहे. तेथील राजकीय घडामोडींमुळे भारताबरोबरचा व्यापार ठप्प झाला असून, अनेक कंटेनर सीमेवर अडकून पडले आहेत. या राजकीय अस्थिरतेमुळे भारताकडून निर्यात होणाऱ्या कापसाच्या निर्यातीवर (Cotton Export) मोठा परिणाम झाला आहे. ३ लाख गाठींची निर्यात सध्या अडचणीत आली आहे. येत्या काळात ही परिस्थिती सुधारली नाही तर ३ लाख गाठींचा माल भारतीय बाजारपेठेत शिल्लक राहणार आहे. त्याचा परिणाम भारताच्या अंतर्गत बाजारावरदेखील पडण्याची शक्यता आहे.
बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेत त्या देशामधील सुताच्या व्यवसायाचा सर्वांत मोठा वाटा आहे. त्यामुळेच बांगला देश मोठ्या प्रमाणात कापसाच्या गाठींची आयात करतो. बांगला देशमध्ये भारत, ब्राझील व अमेरिका या तीन देशांमधून कापसाची निर्यात केली जाते. आंतरराष्ट्रीय कॉटन बाजाराचे तज्ज्ञ अरुण खेतान यांनी सांगितले की, बांगला देशची अर्थव्यवस्था सूत मार्केटवर अवलंबून आहे. त्यामुळे ही परिस्थिती फार काही काळासाठी राहणार नाही. कारण बांगला देशने कापसाची आयात थांबवली तर त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बांगला देशमधील अडचणीत आलेली ३ लाख गाठींची निर्यात ऑगस्ट अखेरपर्यंत सुरळीत होऊ शकते.
काय होणार परिणाम..?
जर बांगलादेशमधील निर्यात होऊ शकली नाही, तर ३ लाख गाठींचा स्टॉक हा भारतीय बाजारपेठेत शिल्लक राहील. यामुळे आगामी हंगामावर परिणाम होऊ शकतो. भारतात १ ऑक्टोबरपासून कापसाच्या नवीन हंगाम खरेदीला सुरुवात होते. तेव्हा गेल्या हंगामातील २५ लाख गाठींचा माल हा शिल्लक असतो. जर निर्यात थांबली तर त्या मालामध्ये ३ लाख गाठींची अधिक भर पडेल. बांगलादेशमधील निर्यात थांब- ल्यासोबत आधी ज्या मालाची निर्यात करण्यात आली होती, त्या मालाची पेमेंटची प्रक्रिया देखील थांबली आहे.
ही परिस्थिती फार काळासाठी राहणार नाही
खान्देश जिनिंग असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप जैन यांनी सांगितले की, सध्या ३ लाख गाठींची निर्यात अडचणीत आली आहे. परिस्थिती अजून चांगली झाली नाही, तर सप्टेंबरअखेरपर्यंत या मालामध्ये अजून २ लाख गाठींची भर पडेल. मात्र, 'सीसीआय कडून यंदा शेतकऱ्यांना ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला असल्याने, शेतकऱ्यांच्या मालावरील दरावर मात्र फारसा परिणाम होणार नाही.
दरवर्षी भारतातून २२ लाख गाठींची होते निर्यात
भारताकडून दरवर्षी ३५ ते ४० लाख कापसाच्या गाठींची निर्यात विदेशात केली जाते. त्यापैकी ५० टक्क्यांपेक्षा अधिक मालाची निर्यात ही बांगला देशात होते. बांगला देशमध्ये दरवर्षी भारताकडून २० ते २२ लाख गाठींची निर्यात केली जाते. त्यात जुलैअखेरपर्यंत १७ लाख गाठींची निर्यात झाली होती. मात्र, सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे भारताकडून जाणाऱ्या ३ लाख गाठींची निर्यात अडचणीत आली आहे. भारतासोबतच ब्राझील व अमेरिकेचीही निर्यात थांबली आहे.