Agriculture News : मागील आठ ते दहा दिवसांपूर्वी मिरची बाजारात हिरव्या मिरचीने भावाच्या बाबतीत अकरा हजार रुपयांचा टप्पा पार केला होता. परंतु, बाजारात मिरचीची आवक एकदम वाढल्याने मागील आठ दिवसांपासून मिरचीचे भाव (Chilly Market) कमी झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana District) पिंपळगाव रेणुकाई येथील मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून सात हजार रुपये प्रतिक्विंटल मिरची खरेदी केल्याने केवळ आठ दिवसात मिरचीच्या भावात तीन ते चार हजार रुपयांची घसरण झाली आहे.
सुरुवातीला भाववाढीमुळे आनंदीत असलेले शेतकरी निराश झाले आहेत. यापुढेदेखील मिरचीची आवक वाढली, तर भावात घसरण (Chilly Market Price) होण्याची शक्यता असल्याचे मिरची व्यापारी सांगत आहेत. मासरूळ परिसरातील शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी मिरचीचे पीक घेतले आहे. मागील महिनाभरापासून ही मिरची शेतकरी विक्रीसाठी बाजारात घेऊन जात आहेत. यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी सुरुवातीला चांगला भाव मिळाल्याने लाखो रुपयांची कमाई केली आहे. सुरुवातीला दहा ते बारा हजार रुपये प्रतिक्विंटल दराने मिरची खरेदी करण्यात आली. त्यामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण होते.
आता मागील आठ दिवसांपासून मिरची बाजारात मिरचीची आवक वाढली आहे. त्यामुळे मिरचीचे भाव टप्प्याटप्प्याने कमी होऊ लागले आहेत. गुरुवारी तीन हजार रुपये प्रतिक्विंटल दराने मिरची विक्री झाली असल्याने शेतकरी निराश झाले. अनेक शेतकऱ्यांची मिरची नुकतीच तोडणीसाठी आली आहे. परंतु, यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळपास ८० टक्के शेतकऱ्यांना आपल्या शेतातील मिरचीची झाडे उपटून फेकावी लागली. त्यामुळे लावलेला खर्चसुद्धा निघाला नसून शेतकरी हवालदिल झाले आहेत. मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी यावर्षी मिरचीची लागवड केली होती. सुरुवातीला गगनाला भिडलेले मिरचीचे भाव एकदम उतरल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
आवक वाढली, पण मागणी कमी !जवळच असलेल्या भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील मिरची मार्केटमध्ये आठ दिवसात चार हजार पोत्याची आवक वाढली. प्रारंभी या बाजारात केवळ पंचवीस क्विंटल मिरचीची आवक होती. ही आवक दिवसेंदिवस वाढत गेली. मागील आठ दिवसांपूर्वी दोन हजार पोत्यांची आवक असणाऱ्या मिरची बाजारात गुरुवारी सहा हजार मिरची पोत्यांची आवक होती. मागणी कमी व आवक जास्तीची असल्याचा फटका मिरची उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.
आजचे मिरचीचे बाजारभाव
जिल्हा | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
13/07/2024 | ||||||
अहमदनगर | --- | क्विंटल | 150 | 2500 | 4333 | 3400 |
अमरावती | --- | क्विंटल | 39 | 3000 | 4000 | 3500 |
चंद्रपुर | --- | क्विंटल | 209 | 3000 | 6000 | 4000 |
जळगाव | --- | क्विंटल | 6 | 4000 | 5000 | 4500 |
जळगाव | लोकल | क्विंटल | 68 | 2000 | 3500 | 2700 |
जळगाव | लवंगी | क्विंटल | 47 | 4000 | 5000 | 4500 |
जालना | हायब्रीड | क्विंटल | 875 | 4000 | 5100 | 4500 |
कोल्हापूर | --- | क्विंटल | 89 | 3000 | 7000 | 5000 |
कोल्हापूर | लोकल | क्विंटल | 32 | 4000 | 5500 | 4800 |
नागपूर | लोकल | क्विंटल | 456 | 4250 | 5000 | 4663 |
नागपूर | हायब्रीड | क्विंटल | 14 | 5530 | 6000 | 5850 |
पुणे | लोकल | क्विंटल | 154 | 4000 | 7000 | 5500 |
सातारा | लोकल | क्विंटल | 42 | 3000 | 7000 | 7000 |
सोलापूर | लोकल | क्विंटल | 120 | 2650 | 6250 | 4250 |
सोलापूर | लवंगी | क्विंटल | 10 | 3000 | 3500 | 3200 |
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) | 2311 |