नंदुरबार : कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत तालुक्यातील घुली पळाशी येथील स्व. राजीव गांधी कापूस खरेदी केंद्र येथे परवानाधारक कापूस खरेदीदार यांचे मार्फत कापूस खरेदी (Cotton Market) केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. सुरुवातीला कमाल भाव सात हजार रुपये क्विंटल मिळाला.
कापूस वेचणीला महिनाभरापासून सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या घरात कापूस भरून पडला आहे. खेडा खरेदी करणारे व्यावसायिक कमी दराने कापूस खरेदी करीत आहेत. त्यामुळे नंदुरबारात (Nandurbar Bajar Samiti) दरवर्षाप्रमाणे कापूस खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती. त्यानुसार बजाार समितीने कापूस खरेदी केंद्र सुरू केले असून नंदुरबार बाजार समितीचे सभापती संध्या वकील पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला.
स्व. राजीव गांधी कापूस खरेदी केंद्र, घुली-पळाशी येथे पहिल्या दिवशी १० वाहनांमधून कापूस विक्रीस आला व साधारणतः १०० क्विंटल कापूस आवक झाली. त्यात कमाल सात हजार रुपये प्रति क्विंटल या भावाने कापूस खरेदी करण्यात आला. शेतकऱ्यांनी आपला कापूस स्वच्छ व कोरडा करून विक्रीस आणावा असे आवाहन सभापती व सचिव यांनी केले आहे.
सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र दिवाळीनंतर....
दरम्यान, येथील केंद्रात परवानाधारक पाच व्यापारी आहेत. त्यांच्याकडून कापूस खरेदी केला जात असतो. गेल्या वर्षी येथील कापूस खरेदी केंद्रात ५५ हजार क्विंटल कापूस खरेदी झाली होती. सुरुवातीला तब्बल नऊ हजार रुपये क्विंटल भाव मिळाला होता. नंतर आवक वाढत गेल्याने भाव सात हजारावर आला होता. पूर्ण हंगामात सरासरी सात ते साडेसात हजार रुपये क्विंटल भाव मिळाला होता. यंदा देखील चांगल्या भावाची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र दिवाळीनंतर सुरू होण्याची शक्यता आहे.
खेतिया येथील खरेदी केंद्राकडे आहे कल... गेल्या महिन्यात खेतिया बाजार समितीने कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात बऱ्यापैकी भाव मिळत होता. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल तिकडे होता. आता नंदुरबारला स्थानिक स्तरावर खरेदी केंद्र सुरू झाल्याने खेतियाकडे जाणारा कापूस नंदुरबारला येईल अशी अपेक्षा आहे. शिवाय खेडा खरेदीतून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक देखील यामुळे टळली जाणार आहे.