जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) होत असलेल्या अवकाळी पावसामुळे सोयाबीन व कापसाच्या (Cotton Production) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आधीच जादा पाऊस व अवकाळीमुळे नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता कापसाला चांगला भाव मिळत नसल्याने फटका बसला आहे. कापसाचे दर हमीभावापेक्षाही कमी झाले आहेत.
एकीकडे अतिवृष्टीमुळे आधीच कापसाच्या उत्पादनात ३० ते ३५ टक्क्यांची घट होण्याचा अंदाज आहे. त्यातच कापसाचेही भावदेखील (Cotton Market) पडल्याने, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कापसाच्या खरेदीला सुरुवात होत असते. मात्र जिल्ह्यात ठराविक जिनर्सकडूनच कापसाची खरेदी केली जात आहे. त्या ठिकाणीही कापसाला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कापसाची आवक थांबवली आहे.
शासकीय खरेदी केंद्राची प्रतीक्षा...
खासगी बाजारात शेतकऱ्यांना हमीभावापेक्षाही कमी दर मिळत आहे. त्यामुळे शासनाकडून कापूस खरेदी सुरू करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. सीसीआय व पणन महासंघाकडून खरेदी सुरू झाली तर शेतकऱ्यांना निदान हमीभावाडतका तरी भाव मिळू शकणार आहे. मात्र, सद्यःस्थितीत पावसामुळे सीसीआयनेही आपले केंद्र सुरू करणे थांबवले आहे. पावसानंतर जिल्ह्यात सीसीआयचे केंद्र सुरू होऊ शकतात. मार्केटमध्येही मागणी नाही.
जिनर्सचाही सावध पवित्रा...
आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कापसाला मागणी नाही. त्यातच भारताच्या मालाची निर्यातदेखील थांबली आहे. यामुळे कापसाला जो उठाव पाहिजे तो उठाव मिळू शकलेला नाही. स्थानिक बाजारात सूत गिरण्यांमध्येही माल पडून आहे. त्यामुळे सध्यातरी कापसाचे भाव वाढण्याची शक्यता कमी आहे. जिनर्सकडूनही नवीन माल घेणे टाळले जात आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक जिनिंगमध्येही कापूस खरेदीला अजूनही सुरुवात झालेली नाही.
हमीभावापेक्षा एक हजार रुपये कमी दराने खरेदी...
पावसामुळे विक्रीसाठी येणाऱ्या कापसाच्या मालात मोठ्या प्रमाणात आर्दता आहे. यामुळे व्यापाऱ्यांकडून आर्द्रतेचे कारण देऊन, कमी भावात शेतकऱ्यांकडून माल खरेदी केला जात आहे. सद्यःस्थितीत खासगी बाजारात शेतकऱ्यांचा मालाला ६,५०० ते ६,६०० रुपये प्रतिक्विंटल एवढा दर दिला जात आहे. शासनाकडून यंदा कापसाला ७ हजार ५०० रुपयांचा हमीभाव निश्चित करण्यात आला आहे. मात्र, हमीभावापेक्षा एक हजार रुपये कमी दराने शेतकऱ्यांना आपला माल विक्री करण्याची वेळ आली आहे.