नंदुरबार : सीसीआयकडून कापसातील ओलावा अर्थात मॉइश्चरची सीमा (Cotton Moisture Level) ही साधारण १२ टक्के ठरवून देण्यात आली आहे. १२ टक्के किंवा त्याखाली ओलाव्याची टक्केवारी आल्यास त्या कापसाला थेट हमी भावानुसारच दर दिले जाणार आहेत. आता नंदुरबार येथील बाजार समितीच्या केंद्राप्रमाणेच शहादा बाजार समितीचे खरेदी केंद्र सुरू झाले आहे.
जिल्ह्यात दरांअभावी मंदीच्या फेऱ्यात अडकलेल्या कापूस खरेदीला (Cotton Market) वेग येणार आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात 'सीसीआय'चे केंद्र येत्या आठ दिवसांत सुरू होणार आहे, कापूस खरेदी व्यवहारांची चाचपणी करण्यासाठी 'सीसीआय'च्या अधिकाऱ्यांनी शहादा येथील कापूस खरेदी केंद्रावर हजेरी लावली. या ठिकाणी ओलावा कमी असलेला कापूस खरेदी झाल्यास प्रथम शहाद्यात सीसीआय केंद्र सुरू करण्याची शक्यता आहे. यानंतर नंदुरबारचे (Nandurbar Markket Yard) केंद्र सुरू होणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यात यंदा खरेदी केंद्रावर कापसाचे दर हे प्रतिक्विंटल ६ हजार ३०० ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंतच आहे. ओलाव्यामुळे व्यापारी अधिक दर देत नसल्याने बाजारात आवक कमी झाली आहे. दसऱ्यापासून नंदुरबार बाजार समितीच्या केंद्रात कापूस खरेदीला प्रारंभ झाला होता. प्रारंभी दरांबाबत शेतकऱ्यांना योग्य तो दिलासा न मिळाल्याने केंद्रातील आवक कमी झाली होती. येत्या काळात ही आवक वाढीची शक्यता कमीच आहे. जिल्ह्यात यंदा परतीच्या पावसामुळे कापसाचे नुकसान झाले आहे. या ओल्या कापसाची वेचणी करूनही बाजारात भाव मिळत नसल्याने शेतकरी कापसाचा साठा करत आहेत.
ओलावा कमी झाल्यास आवक वाढणार
गेल्यावर्षी 'सीसीआय'ने कापसाला प्रतिक्विंटल ७ हजार २० रुपयांचा भाव जाहीर केला होता; परंतु उत्पादन कमी आल्याने सीसीआयची खरेदी पूर्ण क्षमतेने सुरू होण्याआधीच व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली होती; परंतु २०२४-२०२५ या आर्थिक वर्षासाठी प्रतिक्चिटल ७ हजार ५२१ रुपयांचा भाव जाहीर करण्यात आला आहे. सध्या बाजारातील दरांपेक्षा हमीभाव अधिक असल्याने ओलावा कमी झालेला कापूस बाजारात येण्याची अधिक शक्यता आहे.
हेही वाचा : Cotton Market : आकोट बाजारात जाड्या कापसाला काय भाव मिळाला, जाणून घ्या सविस्तर