Join us

कापूस उत्पादकांना दरवाढीची प्रतीक्षा, मागील वर्षीचा कापूस घरातच पडून...

By गोकुळ पवार | Published: December 05, 2023 12:55 PM

भाववाढीच्या प्रतीक्षेत अजूनही मागील वर्षीचा कापूस घरात पडून असल्याचे चित्र आहे.

एकीकडे अवकाळी पावसाने ऐन भरात आलेल्या पिकांचे नुकसान झाले. दुसरीकडे अनेक पिकांचे भावही घसरले. अशा स्थितीत कापूस उत्पादक देखील हैराण झाले असून भाववाढीच्या प्रतीक्षेत अजूनही मागील वर्षीचा कापूस घरात पडून असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नवीन आलेला कापूस ठेवायचा कुठे, या विवंचनेत कापूस उत्पादक शेतकरी अडकला आहे. कापूस उत्पादकांना भाववाढीची प्रतीक्षा असताना भाव मात्र आहे तेथेच असल्याने कापूस अजून किती दिवस घरात संभाळत बसणार, असा प्रश्न कापूस उत्पादकांना सतावत आहे.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात कापसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. दोन वर्षापूर्वी कापसाला चांगला भाव मिळाल्याने त्यानंतर कापूस उत्पादनातही वाढ झाली. तेव्हाच्या भावामुळे आताही चांगला भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांनी ठेवली. मात्र त्यानंतर कपाशीचे भाव कोसळले आणि त्यामुळे गेल्यावर्षी शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवला. मात्र त्यानंतर देखील कपाशीचा भाव ७ हजारपर्यंत खाली आला. यंदाही सात हजारापर्यंत सरासरी भाव असल्याने अजूनही अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरात ठेवेन पसंत केले आहे. भाव वाढ झाल्यास कापूस विक्री करू, असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत. 

चांगला दर मिळण्याची आशा 

कापूस उत्पादक शेतकरी ज्ञानेश्वर अमृतकार म्हणाले की, कापूस उत्पादन खर्च वाढला आहे. दोन वर्षापूर्वी चांगला भाव मिळाल्याने कापूस उत्पादकांना सुगीचे दिवस आले होते. दोन वर्षापूर्वी मिळालेला भाव आताही मिळेल, या आशेवर मागच्या वर्षी कापूस उशिरापर्यंत विकला नाही. तो आजपर्यंत घरातच पडून आहे. मात्र अजूनही भाव वाढत नाहीत. दोनशे क्विंटल कापूस गोडाऊनमध्ये भरून ठेवला आहे. त्यात पुन्हा नवीन आलेला कापूस ठेवायचा तरी कुठे, असा प्रश्न आहे.

कापसाचे आजचे दर काय? 

दरम्यान कापसाचे आजचे दर पाहिले तर अकोला जिल्ह्यात कमीत कमी सात हजार पंचवीस जास्तीत जास्त सात हजार 100 तर सर्वसाधारण दर 7 हजार 62 क्विंटल प्रमाणे आहे. अनुक्रमे बीड जिल्ह्यात कमीत कमी सात हजार वीस रुपये प्रतिक्विंटल जास्तीत जास्त 7110 रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर 7 हजार 80 प्रति क्विंटल दर, चंद्रपूर जिल्ह्यात 6484 रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार 117 रुपये प्रतिक्विंटल दर तर सर्वसाधारण दर प्रति क्विंटल 6867 रुपये, नागपूर जिल्ह्यात प्रतिक्विंटल कमीत कमी दर 6700 तर जास्तीत जास्त दर 7 हजार 25 रुपये तर सर्वसाधारण दर 6875 रुपये, वर्धा जिल्ह्यात प्रतिक्विंटल मागे कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर 7150 तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये आहेत. तर यवतमाळ जिल्ह्यात प्रतिक्विंटल दरामागे कमीत कमी दर 6500 तर जास्तीत जास्त दर सात हजार 70 रुपये तर सर्वसाधारण दर 6900 आहे.

टॅग्स :कापूसजळगावशेती