Join us

Cotton seeds : कापूस बियाणे बॅग 'इतक्या' रुपयांना मिळण्याची शक्यता, कृषी विभागाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 3:05 PM

कृषी विभागाने ठरवून दिलेल्या तारखांना कापूस बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे.

शेतकऱ्यांना कापसाची एक बॅग सर्वसाधारणपणे ८६४ रूपयांना मिळण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण हा भाव काढण्यात आला आहे. कंपन्यांच्या दर्जानुसार किमतीमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. कृषी विभागाने ठरवून दिलेल्या तारखांना कापूस बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. तसेच हंगामपूर्व पेरणी करू नये असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. 

राज्यात खरीप २०१७ च्या हंगामातील शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भावाचा अनुभव लक्षात घेता खरीप २०१८ ते २०२३ मध्ये राबविण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव अल्प प्रमाणात आढळून आला आहे. आगामी खरीप २०२४ च्या हंगामामध्ये ही शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी क्षेत्रिय पातळीवर आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आवश्यक आहे.

त्यासाठी १६ मे २०२४ पासून कापूस बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून प्रत्यक्ष लागवड ही १ जून २०२४ नंतरच होईल हे कटाक्षाने पालन केल्यास शेंदरी (गुलाबी) बोंडअळीचा प्रादुर्भाव व प्रभावीपणे नियंत्रण करणे शक्य होईल. याकरिता क्षेत्रीय स्तरावर कटाक्षाने पालन केले जाणार आहे. अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली आहे.

हंगामपूर्व पेरणी करू नये

कापूस शास्त्रज्ञाच्या मतानुसार शेंदरी बोंडअळीचा जीवनक्रम खंडित न झाल्याने प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येते. हंगामपूर्व कापूस लागवड झाल्यास शेंदरी बोंडअळीचा जीवनक्रमास पोषक वातावरण निर्माण होऊन प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे बोंडअळीचा जीवनक्रम खंडित होण्यासाठी १ जूननंतर पुरेसा पाऊस झाल्यानंतर कापसाची प्रत्यक्ष लागवड करावी, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आलायं. ही बाब लक्षात घेता हंगामपूर्व पेरणी करू नये असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे,

शेतकऱ्यांना बीटी बियाणे यंदा १५ मे पासून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कुठल्याही आमिषाला बळी पडून एचटीबीटीचे बियाणे खरेदी करू नये. अधिकृत बियाणे वितरकाकडून बियाणे खरेदी करून त्याचे पक्के बिल घ्यावे. बियाणे जरी १५ मे पासून उपलब्ध होणार असले तरी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता कपाशी लागवड १ जूननंतर करावी.

- कावेरी राजपूत, कृषी विकास अधिकारी, जि.प., धुळे

टॅग्स :शेतीकॉटन मार्केटकापूसनागपूरशेती क्षेत्र