Join us

संत्रा डिजिटल मंडईत दिवसाला 100 टन संत्री विकली जात आहेत, नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 3:06 PM

पहिली संत्रा डिजिटल मंडई उभारल्यामुळे संत्रा उत्पादकांना फायदा होत असून दिवसाला 100 टन संत्री विकली जात आहेत.

संजय खासबागे 

अमरावती : संत्राबागा घेणाऱ्या व्यापाऱ्यांकडून मिळत असलेल्या कमी दराच्या जाचातून संत्रा उत्पादकांची सुटका करण्यासाठी देशातील पहिली संत्रा डिजिटल मंडई वरुड येथे स्थापन झाली आहे. शेतकऱ्यांना आणलेल्या संत्र्याला ग्रेडेशननुसार वेगवेगळ्या वर्गवारीत टाकले जात असल्याने किरकोळ संत्र्यालाही येथे हमखास दर मिळत आहे. 

खासगी संस्थेच्या सहकार्याने उभारलेल्या या उपक्रमामुळे संत्रा उत्पादकांना नवसंजीवनी मिळाली आहे. कंपनीकडून स्थापित यंत्रातून संत्र्याचे आकारानुसार ग्रेडिंग केले जाऊन ती क्रेटमध्ये आपोआप पडतात. त्यानंतर त्याचा देशाच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित व्यापारी तसेच त्यांच्या प्रतिनिधींमार्फत लिलाव केला जातो. ग्रेडेशनमुळे टाकाऊ संत्रीसुद्धा विकली जात असल्याने याचा संत्रा उत्पादकांना फायदा होत असून दिवसाला १०० टन संत्री विकली जात आहेत.

देशात पहिला डिजिटल संत्रा बाजार संत्रा उत्पादकांना फायदेशीर ठरला आहे. पारदर्शक लिलाव पद्धत, ग्रेडेशन करून विक्री केली जाते. त्याचा जिल्हाभरातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा.   - नरेंद्र पावडे, बाजार समिती सभापती, वरुड

७५ पैसे प्रतिकिलोने ग्रेडिंग

हैदराबाद येथील फुटएक्सने बाजार समितीच्या संत्रा लिलाव मंडईमध्ये ग्रेडिंग युनिट उभारले. यामध्ये ७५ पैसे प्रतिकिलो दराने संत्रा ग्रेडिंग, भराई आणि ग्रेडिंगनुसार लिलाव करण्याची जबाबदारी कंपनीची आहे. प्रतवारीनुसार संत्राविक्री करून वेळीच शेतकऱ्यांना पैसे दिले जातात. पूर्वी संत्राबागेतील फळे उतरविण्यासाठी शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांची प्रतीक्षा असायची, आता थोडा त्रास होत असला तरी योग्य दर मिळत असल्याने शेतकरी संत्रा मंडईत आणत असल्याचे चित्र आहे.

५ हजार ५२० टन संत्री विकली

दिवाळीपासून सुरु झालेल्या डिजिटल संत्रा बाजारात आंबिया बहराची ४ हजार २६० टन व जानेवारी महिन्यात मृग बहराची १ हजार २६९ टन अशी एकूण ५ हजार ५२० टन संत्री ३१ जानेवारीपर्यंत लिलावात विकली गेली. यामध्ये एक नंबर संत्र्याला ४४ रुपये प्रतिकिलो, तर दोन नंबर संत्र्याला ३८ ते ४० रुपये भाव मिळाला, निम्नस्तर संत्रीसुद्धा २० रुपये किलोने विकली गेली.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीमार्केट यार्डअमरावतीशेतकरी