Join us

Onion Export : कांदा निर्यातबंदीचा फटका, देशाची कांदा निर्यात गतवर्षात 13 टक्क्यांनी घटली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 3:46 PM

Onion Export : अनेक वर्षांपासून कांदा निर्यातीच्या धरसोड वृत्तीमुळे परकीय बाजारपेठेत देशाचे स्थान डळमळीत होत आहे.

नाशिक : सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये कांदा निर्यातीतून (Onion Export) ३८७४ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले असले तरी कांदा निर्यातबंदीच्या धरसोडीमुळे कांदा निर्यातीला मोठा फटका बसला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत १३ टक्के निर्यातीत घटल्याचे अपेडाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्राने निर्यात (Onion Issue) शिथिलतेचा निर्णय घेतला. मात्र, आंतरराष्ट्रीय किमतीत झालेली घसरण आणि निर्यात शुल्क वाढीमुळे भारतातून फारसा कांदा निर्यात झाला नाही. कांदा निर्यातीवर गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून बंदी घालण्यात आली होती. या निर्यात बंदीमुळे किमती कमी झाल्याने शेतकऱ्यांचा विरोध वाढला आणि निर्यातबंदी उठवली गेली; पण किमान निर्यात किंमत (एमईपी) आणि ४० टक्के निर्यात शुल्क कायम ठेवण्यात आले होते. यामुळे निर्यात खुली झाली तरी जाचक अटीमुळे कांदा निर्यात मंदावली. 

नाशिकचे व्यापारी म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून कांदा निर्यातीच्या धरसोड वृत्तीमुळे परकीय बाजारपेठेत देशाचे स्थान डळमळीत होत आहे. चीन, इजिप्त आणि पाकिस्तानमधील कांद्याच्या उपलब्धतेमुळे भारताला फटका बसत बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, नेपाळ, संयुक्त अरब अमिरात, इंडोनेशिया, कतार, हाँगकाँग, कुवैत, व्हिएतनाम या प्रमुख देशांमध्ये कांदा निर्यात केला जातो; परंतु निर्यातबंदीचा चांगलाच फटका बसला आहे.

 सरकारने स्वतःच कांदा पिकवावा

कृषीतज्ज्ञ सचिन आत्माराम होळकर म्हणाले की, कांद्याबाबतच्या धरसोडीच्या धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे दीर्घकालीन धोरणाची गरज आहे. तर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे म्हणाले की, कांद्यावर शुल्क आकारून लूट करण्यापेक्षा सरकारने स्वतःच कांदा पिकवावा. सरकारने विनाअट कांदा निर्यात पूर्णतः खुली केली पाहिजे.

काही वर्षातील निर्यात 

गेल्यावर काही वर्षातील कांदा निर्यातीचा आढावा घेतला असता 2013-14 मध्ये 13.50 लाख टन, 2014-15 मध्ये 10.86 लाख टन, 2015-16 मध्ये 11.14 लाख टन, 2016-17 मध्ये 34.92 लाख टन, 2017-18 मध्ये 30.88 लाख टन, 2018-19 मध्ये 21.86 लाख टन, 2019-20 मध्ये 11.49 लाख टन, 2020-21 मध्ये 15.77 लाख टन, 2021-22 मध्ये 15.37 लाख टन, 2022-23 मध्ये 25.25 लाख टन तर 2023-24 मध्ये 17.17 लाख टन अशी कांदा निर्यात झाली आहे. 

टॅग्स :कांदानाशिकमार्केट यार्डशेती क्षेत्रशेती